Latest

जागतिक चहा दिन विशेष : लोकराजा राजर्षी शाहू अन् चहा…

अनुराधा कोरवी

कोल्हापूर; सागर यादव:  जगभर पाण्यानंतर सवार्धिक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा. दिवसाची सुरुवात बहुतांश लोक चहानेच करतात. गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला परवडणारे आणि आवडणारे हे पेय आहे. जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे, यासाठी 2005 पासून 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताबरोबरच श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, टांझानिया अशा अनेक देशांमध्ये चहा दिवसाचे सेलिब्रेशन केले जाते.

पेठांमधील आपलेपणा, तालीम-मंडळांचा रांगडेपणा, पंचगंगेचा निखळपणा, मैत्रीचा प्रेमळपणा आणि चमचमीत मसाल्यांचा गोडपणा अशा पाच प्रकारची खासीयत असणारे शहर म्हणजे 'शाहूनगरी' कोल्हापूर. अशा करवीरनगरीचे भाग्य विधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि चहा या विषयाचे कोल्हापूरच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. किंबहुना राजर्षी शाहू महाराज यांनी दूरद़ृष्टीने केलेल्या कार्याचा साक्षीदार कोल्हापूरचा चहा म्हणावा लागेल.

पन्हाळा चहा देशभर प्रसिद्ध

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या प्रजेच्या विकासासाठी विविध प्रयोग केले. शिक्षण, कला, क्रीडा, उद्योग- व्यापार या बरोबरच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तलाव-धरणांची बांधणी करून बारमाही पाण्याची व्यवस्था केली. पारंपरिक पिकांबरोबर चहा, कॉफी, रबर, वेलदोडे, कोको, मसाले, रेशम या पिकांच्या उत्पादनासाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळही दिले.

कोल्हापूरच्या पश्चिम भागात मुबलक पर्जन्यमान असणार्‍या सह्याद्री पर्वत रांगातील उतार जमिनीवर त्यांनी चहा, कॉफी, रबर यांचे मळे तयार केले. मसाई पठार परिसरातील चहाच्या मळ्याचा प्रयोग यशस्वी झाला. उत्कृष्ट दर्जाचा चहा कोल्हापूर संस्थानात उत्पादित होऊ लागला. 'पन्हाळा टी नंबर 4' या नावाने या चहाची विक्री देशभर होऊ लागली. देशातील विविध संस्थांना हा चहा पाठवीला जात होता. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना कोल्हापूरचा चहा आवडायचा.

त्यांनी आपल्या संस्थानातही चहाच्या मळ्यांची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेत याबाबत राजर्षी शाहू महाराज यांचे आवर्जुन मार्गदर्शन घेतले होते; मात्र दुर्दैवाने राजर्षी शाहूंच्या दूरद़ृष्टीच्या कार्याचा विसर कोल्हापूरकरांना पडला. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच चहाच्या मळ्यांकडेही कोल्हापूरकरांचे दुर्लक्ष झाले. यामुळे 'पन्हाळा चहा'ही इतिहासजमा झाला.

सत्यसुधारक हॉटेलचा चहा

रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणार्‍या शिवछत्रपतींचा वारसा जपत तो विकसित करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राजर्षी शाहूंनी बजावली. 26 जुलै 1902 ला सामाजिक समतेचा जाहीरनामा केला. जाती- धर्म, उच-नीच भेदभाव दूर करण्यासाठी विविध कृतिशील उपाय-योजना केल्या. तत्कालीन सरकारी पागेत मोतद्दार असणार्‍या मागास समाजातील गंगाराम कांबळे यांना सवर्णांनी आपल्या पाण्याच्या हौदातील पाणी घेतल्याबद्दल रक्तबंबाळ होईपर्यंत मारले.

दिल्लीहून परतलेल्या शाहू महाराज यांना ही गोष्ट समजताच त्यांनी मारहाण करणार्‍या लोकांना शिक्षा दिली. इतकेच नव्हे तर गंगाराम कांबळे यांना जुना राजवाडा ते नवा राजवाडा या भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल काढून दिले. महाराज येता-जाता हॉटेलमध्ये थांबूण सर्व जाती-धर्माच्या लोकांसह आवर्जुन गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहा पित होते. सामाजिक समतेचा हा राजर्षी शाहूंचा प्रयोग आजही जगप्रसिद्ध आहे. 'शाहूभक्त' गंगाराम कांबळे यांचे स्मारक आजही भाऊसिंगजी रोडवर या इतिहासाची साक्ष देत आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT