गरोदर महिलांत कोव्हिड लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन, प्रसूतीनंतर सोळा महिलांच्या वारेची तपासणी : डॉ. सतीश पत्की | पुढारी

गरोदर महिलांत कोव्हिड लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन, प्रसूतीनंतर सोळा महिलांच्या वारेची तपासणी : डॉ. सतीश पत्की

कोल्हापूर; पुढारी वत्तसेवा : गरोदर महिलेमध्ये कोव्हिड संक्रमण झाले, तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. गरोदरपणात ज्या गोष्टी टाळाव्यात नेमक्या अशाच गोष्टी करण्याची वेळ येते. सी.टी. स्कॅन, रेमडेसिवीर व प्रतिजैविक औषधांचा अतिरिक्त वापर, असे घातक उपचार व तपासण्या कराव्या लागतात. दुर्दैवाने प्रसूतीच्या वेळी गरोदर महिलेस कोव्हिड झाल्यास प्रसूती आय.सी.यू. असलेल्या हॉस्पिटलमध्ये करणे क्रमप्राप्त होते.

कोव्हिडमधून पूर्णपणे बरे झाल्यानंतर प्रसूती झाली, तर बाळाला काही धोके निर्माण होतात का? ते नेमके कसे होतात? यासाठी पत्की हॉस्पिटलमध्ये जानेवारी ते मे 2021 या कालावधीत संशोधन प्रकल्प राबवण्यात आला. त्यांतर्गत गरोदर महिलांत कोव्हिड लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधन यशस्वी झाले आहे, अशी माहिती डॉ. सतीश पत्की यांनी दिली. संशोधनात डॉ. सुहद्ध पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांच्या टीमने विशेष कष्ट घेतले.

संशोधन प्रकल्पात प्रसूतीवेळी बाळाच्या जन्मानंतर मिळणार्‍या वारेची सखोल तपासणी करण्यात आली. गरोदरपणामधील कोव्हिडमधून बरे झालेल्या सोळा महिलांच्या वारेची तपासणी ‘इम्युनोकेमिस्ट्री व इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली. त्यातून मिळालेले निष्कर्ष महत्त्वाचे आहेत.

कोव्हिड विषाणूचा आईच्या रक्तामधून बाळामध्ये प्रवेश होण्याची शक्यता नगण्य असली, तरी बाळाकडे वारेच्या द्वारा रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण अशा महिलांच्या वारेमध्ये आढळले आहे. त्यामुळे गर्भाशयात असलेल्या बाळाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे बाळाची वाढ कमी होऊन कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, गर्भजलाचे प्रमाण कमी होणे, असे दुष्परिणाम होऊ शकतात. कोव्हिडच्या गंभीर संक्रमणास गरोदर महिलेला सामोरे जावे लागले, तर मातेबरोबरच गर्भाशयामधील बाळाला काहीप्रसंगी मृत्यूचाही धोका उद्भवू शकतो.

या संशोधनाच्या निष्कर्षामुळे गरोदर महिलेमध्ये कोव्हिड संक्रमणच होऊ न देणे हितकारक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे पूर्वी कोव्हिड लस घेतली नसल्यास गरोदरपणात लस घेण्याचे महत्त्व या संशोधनामुळे अधोरेखित झाले आहे. गरोदर महिलांनी कोव्हिड लसीकरण करून घ्यावे, या आवाहनास पुष्टी देणारे पत्की हॉस्पिटलचे हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे.

सध्या ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्याचे संकेत दिसत असताना गरोदर महिलांनी कोव्हिड लसीकरण पूर्ण करणे हे माता व होणार्‍या बाळाच्या आरोग्याच्या द़ृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन ‘अ‍ॅक्टा सायंटिफिक’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे, असेही डॉ. पत्की यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button