उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट | पुढारी

उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. पंरतु, ही केवळ सदिच्छा भेट होती, असे उदयनराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शरद पवारांसोबच्या भेटीचा फोटा उदयनराजे यांच्याकडून ट्विट करण्यात आला आहे. पंरतु, गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी बघता या भेटीवरून अनेक तर्कविकर्त काढले जात आहेत.

बुधवारी सकाळी गुलाब फुलांचा गुच्छ घेऊन उदयनराजे शरद पवार यांच्या घरी दाखल झाले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याचे कळतंय. या दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. शरद पवारांच्या वाढदिवसांच्या दिवशी त्यांना भेटता आले नसल्याने उदयराजे यांनी आज त्यांची भेट घेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तींयांकडून देण्यात आली आहे. पंरतु, या भेटीच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

येत्या काळात सातारा पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होवू घातली आहे. अशात या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. उदयनराजे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पोटनिवडणुकीत उदयनराजे पराभूत झाले होते. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील सातारा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवारांची भरपावसातील प्रचारसभा चांगलीच गाजली.उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम आणि आदरभाव आजही त्यांच्या मनात आहे.

काही दिवसांपासून उदयनराजे भाजपवर नाराज असल्याची चर्चा साताऱ्यात सुरु आहे. भाजपचे जिल्हाध्यक्षांनी एका कार्यक्रमात साताऱ्याचा खासदार निंबाळकर यांच्या सारखा असावा असे वक्तव्य केले होते. या विधानावरून उदयनराजे नाराज झाले होते. पंरतु, निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे स्पष्ट करीत साताऱ्यातून उदयनराजे हेच खासदारकीसाठी योग्य असल्याचे सांगत सारवासारव केली होती.

हे ही वाचा :

Back to top button