वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष अवघ्या भारतवर्षात दूरदूरपर्यंत साजरा झाला Pudhari File Photo
बहार

क्रीडा : वर्ल्ड कप क्रिकेटचा, विजय भारतवर्षाचा!

विजयाचा जल्लोष अवघ्या भारतवर्षात दूरदूरपर्यंत साजरा

पुढारी वृत्तसेवा
विवेक कुलकर्णी

क्रिकेट हा भारतात केवळ खेळ नाही तर तो धर्म आहे. आयकॉन म्हणजे काय, हे समजून-उमजून घ्यायचे असेल तर त्यासाठी क्रिकेटपटूंसारखे उदाहरण शोधून सापडणार नाही. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडू भारतात आहेत, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम क्रिकेट लीगही भारतातच आहेत. पण, इतके सारे काही असूनही आयसीसीचे जेतेपद मात्र भारतालाच सातत्याने हुलकावणी देत होते. गेल्या शनिवारी मात्र विजयश्रीने भारताच्या गळ्यात माळ घातली आणि या विजयाचा आनंद, या विजयाचा जल्लोष अवघ्या भारतवर्षात दूरदूरपर्यंत साजरा झाला.

शेवटच्या सहा चेंडूंत दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची गरज... चेंडू मध्यमगती गोलंदाज हार्दिक पंड्याच्या हाती... हा तोच पंड्या, ज्याची पूर्ण आयपीएल स्पर्धेत हुर्यो उडवली गेलेली... पण, आता समीकरण बदललेले... आता सारे भारतीय, सारे चाहते पंड्याच्या पाठीशी, एकजूटपणाने उभे... अवघ्या भारतवर्षात जणू सर्व देव पाण्यात ठेवले गेलेले... एकेक चेंडू पडत गेला... हृदयाचे ठोके वाढत गेले... हार्दिकचा पहिलाच चेंडू वाईड फुलटॉस... त्यावर मिलेरचा काळजावर घाव घालणारा उत्तुंग फटका... कर्णधार रोहित शर्माने गुडघ्यावर टेकत हाय खाल्लेली... पण, तिकडे वाईड लाँग ऑफवरील सूर्यकुमार यादवचे इरादे मिलरच्या फटक्यापेक्षाही अधिक बुलंद होते... त्याने दोन्ही हातांनी झेल टिपला... आपण सीमारेषेबाहेर जातोय, हे लक्षात येताच अतिशय हुशारीने चेंडू वर फेकला... आणि नंतर अगदी क्षणार्धात तोल सावरत, सीमारेषेच्या आत येत एक अप्रतिम झेल टिपला... हा त्याने टिपलेला झेल नव्हता... हा त्याने टिपलेला विश्वचषक होता! कारण, खर्‍या अर्थाने इथून सामन्याला मोठी कलाटणी मिळाली... अगदी सूर्याच्याच भाषेत सांगायचे तर 360 अंश कोनातील कलाटणी!

नंतर समीकरण होते 5 चेंडू 16 धावा. रबाडाने आल्या पावली चौकार वसूल केला. पुढील 2 चेंडूंत आणखी 3 धावा झाल्या आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर रबाडा बाद झाला. नवे समीकरण होते एका चेंडूत 9 धावा. नोर्त्झेला एकच धाव काढता आली आणि भारताच्या विश्वचषक विजेतेपदावर अखेर शिक्कामोर्तब झाले!

तत्पूर्वी, मात्र चित्र वेगळे होते. गुणवत्ता, पैसा व प्रभाव असे सारे 24 तास दिमतीला असतानाही जेतेपद सातत्याने हुलकावणी देत होते. मध्यंतरी सचिनला त्याच्या 100 व्या शतकाने असाच घोर लावला होता. पण, ढाका येथे बांगला देशविरुद्ध सचिनने अखेर महाशतक झळकावले. शतक साजरे करत असतानाच आकाशाकडे नजर लावली अन् आकाशाला जणू प्रश्न विचारला, इतकी प्रतीक्षा का करावी लागली? यंदाच्या विश्वचषकात जेतेपदावर मोहोर उमटवण्यापूर्वी भारतीयांच्या मनामनातही हाच प्रश्न होता, इतकी प्रतीक्षा का? खरं तर या प्रश्नाची अनेक कारणे आहेत. अनेक उत्तरे आहेत, अनेक पैलू आहेत अन् अनेक कंगोरेदेखील आहेत. खेळातील एकजिनसीपणा, आदर्शवत संघबांधणी, काटेकोर गेम प्लॅन आणि प्लॅन ए चालत नसेल तर तत्काळ प्लॅन बीची अंमलबजावणी, ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे.

रोहित-विराट या विश्वचषकात सातत्याने सलामीला आले. विराट सातत्याने अपयशी होत होता. बदलाची मागणी जोर धरत होती. पण गेम प्लॅन ठरलेला असेल तर त्यात काडीमात्र बदल नाही, हे द्रविड यांचे धोरण अगदी अखेरच्या क्षणी भारताला धवल यश देऊन गेले अन् तेही निर्णायक फायनलमध्ये! याचे कारण पूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेला विराट निर्णायक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर तुटून पडत गेला, प्रशिक्षक द्रविड यांचा विश्वास सार्थ ठरवत गेला अन् इथेच सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातातून निसटून जात राहिला! अगदी पहिल्या चेंडूपासून केवळ तुटून पडणे हा आपला हक्कच असल्याप्रमाणे रोहित शर्माने येथे जवळपास प्रत्येक संघावर साम्राज्य गाजवले. चेंडू अगदी फुटबॉलप्रमाणे दिसत असावा की काय, या थाटात फलंदाजी करणार्‍या रोहितने फ्लाईंग स्टार्ट दिला नसता तरच नवल होते. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना रोहितची फलंदाजी चाहत्यांना मनमुराद आनंद तर देऊन गेलीच. शिवाय, धावफलकही सातत्याने हलता ठेवून गेली. 150 च्या खाली स्ट्राईक रेट हा रोहितच्या बॅटचा स्वभाव नाही आणि यंदाच्या विश्वचषकातही यापेक्षा वेगळे चित्र असण्याचे कारण नव्हते!

सूर्यकुमार यादव एरवी फलंदाजीतील अफलातून फटक्यांसाठी अधिक लाईमलाईटमध्ये असतो. पण, यंदा त्याने क्षेत्ररक्षणातही आपण खर्‍या अर्थाने उगवता सूर्य असल्याचा दाखला दिला. त्याने घेतलेला अफलातून झेल अवघ्या क्रिकेट जगताला स्तिमित करुन गेला. झेल घेत असताना सूर्याचा पाय सीमारेषेला पुसटसा लागला होता का, यावर आजही अनेक मतमतांतरे आहेत. पण, सूर्या त्याच्या फलंदाजीइतकाच स्वत:च्या खेळाशीही प्रामाणिक आहे. सीमारेषेला पुसटसा स्पर्श झाल्याचीही जाणीव झाली असती तरी त्याने ना अपील केले असते, ना विकेटचा जल्लोष साजरा केला असता, ही बाबही तितकीच लक्षवेधी! शोलेतील गब्बरने ‘कितने आदमी थे’ असा प्रश्न विचारावा, त्याप्रमाणे बुमराहने ‘कितने विकेटस् चाहिए’ अशा थाटात टिच्चून गोलंदाजी केली. एकेक फलंदाजाला खुर्चीला पाय बांधून ठेवावेत, तसे जखडून ठेवले आणि निर्णायक क्षणी लाख मोलाचे विकेटस्ही घेतले. विकेटस् घ्यायचे असतील तर रोहित एका सेकंदाचाही विचार न करता बुमराहकडे चेंडू सोपवायचा आणि बुमराह देखील इमानेइतबारे विकेटस् काढून देण्याची जबाबदारी अगदी इत्थंभूतपणे पार पाडायचा!

सूर्याने मावळावे, सूर्यफुलाने वळावे, या भक्तीतले प्रेम कसे कुणाला कळावे, इतकी समरसता बुमराहची गोलंदाजी आणि त्याने हमखास विकेटस् काढून देण्याचे गणित यात दिसून आली! पाकिस्तानविरुद्धचे उदाहरण यासाठी अतिशय समर्पक ठरते. रिझवान धोकादायक ठरणार, अशी चिन्हे असतानाच बुमराहसारखा मसिहा भारताच्या मदतीला धावून आला आणि अगदी 10-12 पावलांच्या छोट्या रनअपने त्याने रिझवानची यष्टी इतक्या बेमालूम उद्ध्वस्त केली की, याचा अगदी रिझवानलाही पत्ता लागला नाही! तसे पाहता यंदाच्या विश्वचषकाने अनेक आठवणी पोतडीत साठवून दिल्या आहेत. जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अनेक खेळाडूंचे आनंदाश्रू दिसून आले. रोहितचे डोळे डबडबले, टेनिसमधील जोकोविचने कोर्टवरील मातीचा आस्वाद घेतला, त्याप्रमाणे रोहितनेही विश्वचषक जिंकून देणार्‍या मातीची चव चाखून पाहिली. चव तीच होती, विजयाची चव!

पूर्ण आयपीएलमध्ये हुर्योला, शेरेबाजीला सामोरे जावे लागलेल्या हार्दिक पंड्याने या स्पर्धेत मैदानावर केलेला उलटफेर निव्वळ दखलपात्र! शेवटचे षटक टाकत असताना 16 धावांचे संरक्षण करण्यासाठी देखील वाघाचे काळीज लागते आणि ती धमक हार्दिक पंड्याने इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही दाखवली. त्याने एकेक चेंडू अगदी गेम प्लॅनप्रमाणे टाकला आणि अन् म्हणूनच शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याच्या जाळ्यात मिलरसारखा मासा अलगद सापडला. शेवटच्या षटकात त्याने किंचित आपला रनअप वाढवला आणि ही रणनीती धमाल करून गेली. पंड्याला ‘प्रेशर सिच्युएशन’ आवडतात. त्याने संकटाचे रूपांतर संधीत केले आणि संघाला हवाहवासा विजय अन् हवाहवासा विश्वचषक, हे दोन्ही मिळवून दिले!

2011 मध्ये भारताने वन डे विश्वचषक जिंकला, त्यावेळी सचिनला अवघ्या संघ सहकार्‍यांनी उचलून धरले होते. यंदा ती मानवंदना रोहित, विराट या खेळाडूंसह प्रशिक्षक या नात्याने द्रविडला देखील लाभली. एरवी द्रविडच्या चेहर्‍यावरील कधीही अगदी रेषही बदलत नाही. पण या विश्वचषक विजयाने द्रविडला पुरते उल्हसित केले. द्रविड कधी नव्हे इतके व्यक्त होत होते, विजयाचा आनंद साजरा करत होते. जे यश खेळाडू या नात्याने मिळवता आले नाही, विश्वचषक जिंकता आला नाही, ते यश त्यांनी प्रशिक्षक या नात्याने मिळवून दिले. प्रशिक्षक या नात्याने विश्वचषक जिंकून दिला! हा सारा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत राहिला.

आजच्या घडीला रोहित शर्मा 37 वर्षांचा आहे. विराट कोहली-जडेजा पस्तिशीच्या घरात पोहोचलेत तर द्रविडसाठी देखील प्रशिक्षक या नात्याने ही शेवटची स्पर्धा होती. या सर्वांसाठी त्यांच्या कारकिर्दीची येथे यथोचित सांगता झाली. भारताने विश्वचषक जिंकण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे व्यवस्थापन-प्रशिक्षक-कर्णधार-खेळाडू असे सारे घटक परस्परपूरक ठरत राहिले. न्यूयॉर्कपासून सुरू झालेल्या या प्रवासाची बार्बाडोसमध्ये यशस्वी सांगता झाली. हजारो पाय असणारी गोगलगाय दोन-चार पाय गळून पडले तरी नेटाने पुढे सरकत राहते, तसे मजल-दरमजल प्रवासात एकेक माईलस्टोन सर केले गेले, एकेक आव्हान पार केले गेले आणि एक दिवस असाही उगवला, जो फक्त आणि फक्त भारताचाच होता! त्या दिवसाने विश्ूवचषकावर भारताची मोहोर उमटवली आणि मध्यरात्र उलटून जात असतानाही चाहत्यांचे थवेचे थवे देशातील रस्त्यारस्त्यावर उतरत राहिले, विजयाचा आनंद साजरा करत राहिले.

भारतात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना दैवत का मानतात, याचा अवघ्या क्रिकेट विश्वाला आणखी एक अनुभवसंपन्न करणारा दाखला मिळून गेला. आजच्या घडीला भारताची क्रिकेट इंडस्ट्री इथल्या बॉलीवूड इंडस्ट्रीपेक्षाही अधिक विस्तारली गेली आहे. याचाच परिपाक म्हणजे भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी काही कालावधीतच 125 कोटी रुपयांचे भरभक्कम बक्षीस जाहीर केले. अवघे आठ आठवडे चालणार्‍या आयपीएलमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली जातात, खेळाडूंवर पैशाचा वर्षाव होतो, ही सारी भारतीय क्रिकेटचे एका मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतर होण्याचीच काही प्रातिनिधिक उदाहरणे. आजच्या घडीला रोहितची पत्नी रितिका सजदेह स्टँडसमधून दिसून येते, विराट कोहली सामन्यानंतर मैदानातून परतत असताना पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल करताना दिसून येतो अन् पत्नी संजना गणेशन मुलाखत घेत असताना बुमराह तिला गोड मिठी मारताना दिसून येतो. विश्वचषकाचा, या विजयाचा जल्लोष प्रदीर्घकाळ संस्मरणात राहणारा आहेच. शिवाय, क्रिकेटच्या ब्रँडला देखील आणखी फुलवणारा आहे. एक प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या कारकिर्दीची यथोचित सांगता, रोहित-विराट-जडेजासाठी खेळाडू या नात्याने कारकिर्दीची यथोचित सांगता, अशा अनेक गोड आठवणी यंदाच्या विश्वचषकाने दिल्या. ही गोड आठवण पुढील प्रदीर्घ कारकिर्दीत नवा माईलस्टोन ठरत असेल तर त्यातही आश्चर्य नसेल!

बोल विराटचे...

सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराटचे शब्द हृदयात कोरुन ठेवणारे होते. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी हा शेवटचा विश्वचषक! आणि ज्यासाठी आपण हा सारा अट्टाहास करतो, ते आम्ही जिंकलेले आहे! माझ्यापेक्षा रोहित या विश्वचषक जेतेपदाचा अधिक हक्कदार आहे. माझ्यासाठी हा सहावा टी20 विश्वचषक तर त्याच्यासाठी नववा! आता नाही तर कधीच नाही, हे मी माझ्या मनावर बिंबवले होते.अखेर आम्हाला विजयश्रीने माळ घातली! विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अखेर सत्यात उतरले! आता ताज्या दमाचे युवा खेळाडू पुढे येतील, संघाचा वारसा पुढे नेतील, तिरंगा जागतिक स्तरावर उंचावत नेतील, डौलाने फडकवत राहतील’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT