विल्यम्सबर्ग : चालते बोलते म्युझियम

विल्यम्सबर्ग : इतिहासाचे चालते बोलते जिवंत संग्रहालय
Williamsburg famous historic city
विल्यम्सबर्ग म्युझियमPudhari File Photo
Published on
Updated on

अनिल टाकळकर, वॉशिंग्टन डी सी

अमेरिकेच्या राजकीय क्रांतीत आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे छोटे शहर म्हणजे विल्यम्सबर्ग. व्हर्जिनियाच्या या राजधानीवर एकेकाळी बिटिशांची सत्ता होती. अठराव्या शतकातील हे ब्रिटिश वसाहतीखालील शहर जसेच्या तसे जपून ठेवण्याचा जागतिक पातळीवरील पहिलावहिला यशस्वी प्रयोग आपल्यालाही बरेच काही शिकवून जाणारा आहे.

अठराव्या शतकातील एखादे छोटे शहर जसेच्या तसे जपून ठेवण्याचा प्रयत्न इच्छाशक्ती असेल तर प्रत्यक्षात कसा येऊ शकतो, याचे आदर्श उदाहरण म्हणून अमेरिकेच्या व्हर्जिनिया या एकेकाळची राजधानी असलेल्या विल्यम्सबर्गकडे पाहता येईल. गेल्याच आठवड्यात या ऐतिहासिक शहराला आवर्जून भेट दिल्यावर जागतिक पातळीवरील या पहिल्यावहिल्या प्रयोगाचे मनापासून कौतुक वाटले. इतिहासाचे चालते बोलते जिवंत संग्रहालय (लिव्हिंग हिस्ट्री म्युझियम) हे त्याचे वर्णन किती अचूक आहे, याचे प्रत्यंतर एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेल्या या छोटेखानी टुमदार शहरात आल्यावाचून राहत नाही. अमेरिकन राज्य क्रांतीची बीजे इथे रोवली गेल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक आहे. या शहरात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर उलटसुलट वादविवाद आणि व्यापक विचारमंथन झाल्यानंतर जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले व ज्या घटना घडल्या त्यातून अमेरिकेचा जन्म झाला, असे म्हटले जाते.

विल्यम्सबर्ग या गावाचे क्षेत्र अवघे 301 एकरांचे

वॉशिंग्टन डी सी नजीक असलेल्या फेअरफॅक्स या शहरापासून सुमारे 145 मैल (सुमारे 233 किलोमीटर) अंतरावर मोटारीने इथे जाण्यासाठी लागतात अवघे अडीच तास. शहरी गजबजाटापासून दूर असलेले हे निसर्गरम्य गाव. येथील हिरवेगार डेरेदार वृक्ष, हिरवळी आणि रंगीबेरंगी फुलांचे ताटवे मन प्रसन्न आणि ताजेतवाने करणारे. भूतकाळाचा आभास इथे वर्तमानकाळात करून दिला जातो. हा अनुभव तसा दुर्मीळच. या गावाचे क्षेत्र अवघे 301 एकरांचे (म्हणजे पुणे विद्यापीठाच्या आवारापेक्षाही छोटे). त्याचा मुख्य रस्ता (ड्यूक ऑफ ग्लाऊसेस्टर स्ट्रीट) मोटार आणि इतर वाहनांसाठी बंद असल्याने पर्यटक पायी रस्त्यावरून चालण्याचा आनंद घेऊ शकतात. हे रस्ते कॉबलस्टोनपासून तयार करण्यात आलेले. त्यामुळे या काळाचा फील आणून देणारे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी या ठिकाणाला 1934 मध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा रस्ता ‘द मोस्ट हिस्टॉरिक अ‍ॅव्हेन्यू इन अमेरिका’ असल्याचे घोषित केले. त्या काळात दुतर्फा इमारती असलेल्या या मुख्य रस्त्यावर सारी वर्दळ असायची. अठराव्या शतकातील ब्रिटिशांची चर्च, सरकारी कार्यालये, दवाखाने, न्यायालय, तुरुंग, घरे, कॉलेज इत्यादी कसे होते, हे जाता जाता पाहता येते. अधूनमधून तत्कालीन शाही बग्गीतून जाणारे पर्यटकही इथे दिसत होते. त्या बग्गीचालकाने केलेला तत्कालीन पोशाखही तुम्हाला भूतकाळाची आठवण करून देणारा. त्याबरोबरच त्या काळातील पेहराव परिधान केलेले येथील गाईडस् तुम्हाला त्या पद्धतींचा, फॅशन्स आणि रीतीरिवाजांचा परिचय करून देणारे. इथे असलेल्या 80 टक्के वास्तू थोडीशी डागडुजी करून तशाच ठेवल्या आहेत. महत्त्वाच्या वास्तूंमध्ये न्यायालयही येते. त्याच्या इमारतीला भेट दिल्यावर पर्यटकांपैकी इच्छुकांना काही काळापुरते न्यायाधीश, आरोपी, फिर्यादी, त्यांचे वकील अशा भूमिका निभावता येतात. शिक्षा देताना त्या आरोपींना प्रथम आर्थिक दंड, रोख रक्कम नसेल तर मालमत्ता विकून दंड भरण्याची मुभा आणि मालमत्ताच नसेल, तर शारीरिक शिक्षा अशी पद्धत त्याकाळी रूढ होती, त्यावेळी हात अथवा इतर अवयव कापण्याची शिक्षाही होती. त्यासाठीचे गिलोटिनही बाहेर पाहण्यासाठी ठेवलेले होते. पर्यटकांनाच न्यायालयीन प्रक्रियेच्या नाटकात सहभागी केल्याने न्यायपद्धतीची कार्यपद्धती अधिक स्पष्ट होण्यास मदतच होते. त्या काळातील विविध बलुतेदार कसे काम करीत याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळते. लोहार, सुतार, विणकर, बेकर्स, प्रिंटर्स, विग मेकर यांंची कामे प्रत्यक्ष पाहण्याची संधी इथे मिळते. शेतकरी कसे काम करीत होते व त्याकाळात कोणती औजारे वापरात होती, हेही तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहता येते. इतकेच नव्हे, तर तुम्ही त्यात सहभागीही होऊ शकता, त्या काळातील बंदुका, तोफा कशा होत्या व त्या कशाप्रकारे वापरल्या जायच्या, याचेही प्रात्यक्षिक इथेे पाहता येते. तोफगोळे सोडल्याचा आवाजही त्यामुळे या शांत परिसरात आपले लक्ष वेधून घेणारा. त्या काळातील संगीताचा आनंददेखील रेस्टॉरंटमधून घेता येतो. या ब्रिटिश वसाहतीत गव्हर्नर हा सर्वेसर्वा होता. इंग्लंडच्या राज्यकर्त्यांकडून आलेल्या हुकुमाचा तो ताबेदार. साहजिकच, त्याच्याकडेही मोठा शस्त्रसाठा असायचा. अशी पाचशेहून अधिक शस्त्रास्त्रे (बंदुका, तलवारी इत्यादी) येथील गव्हर्नर पॅलेसमधील भिंतींवर आकर्षकरीत्या लावण्यात आली होती.

राजकीय , आर्थिक आणि शैक्षणिक घडामोडीचे महत्त्वाचे केंद्र

विल्यम्सबर्ग हे त्या काळातील राजकीय , आर्थिक आणि शैक्षणिक घडामोडीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. प्रथम मिडल प्लँटेशन म्हणून 1632 मध्ये ते स्थापन करण्यात आले. जेम्स आणि यॉर्क या नद्यांमधील प्रदेशात त्याची स्थापना झाली. जेम्सटाऊन, यॉर्क टाऊन आणि विल्यम्सबर्ग हा ऐतिहासिक भागाचा त्रिकोण मानला जातो. 1607 मध्ये अमेरिकेच्या जेम्सटाऊन या शहरात पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन करण्यात आली. जेम्सटाऊन इथे पुरातत्त्व खात्याच्या वेगवेगळ्या साईटस्वर अनेक ऐतिहासिक बदलांचा परामर्श घेता येतो. हजारो ऐतिहासिक वस्तू असलेले म्युझियमदेखील त्यावर प्रकाश टाकणारे आहे. 1781 मध्ये अमेरिकन क्रांतीसाठी झालेल्या निर्णायक युद्धाचे ठिकाण म्हणजे यॉर्कटाऊन. तेथे बॅटल फिल्ड म्युझियम आहे. तसेच यॉर्कटाऊन विजयाचे स्मारकही आहे. यापूर्वी जेम्सटाऊन ही व्हर्जिनियाची राजधानी होती. परंतु, असंतोषानंतर तेथील आगीत त्यातील बराच प्रदेश भस्मसात झाला. व्हर्जिनिया असेम्ब्लीकडे वसाहती संस्कृतीतील नेत्यांच्या मागणीनुसार ही राजधानी मिडल प्लँटेशनला 1699 मध्ये हलविण्यात आली, त्यानंतर 1699 मध्येच इंग्लंडचे राजे विल्यम (तिसरे) यांचे नाव या भागाला दिले गेले आणि हे शहर विल्यम्सबर्ग झाले. त्याला राजधानीचाही दर्जा देण्यात आला. त्याचे 300 वे वर्ष 1999 मध्ये समारंभपूर्वक साजरे करण्यात आले. संभाव्य हल्ल्यांपासून सुरक्षित म्हणून या शहराची निवड करण्यात आली. क्रांतिकारी कल्पना आणि राजकीय हालचाली तेथे मोठ्या प्रमाणावर होत होत्या. अमेरिकेचे माजी अध्यक्ष थॉमस जेफर्सन, पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन, त्या काळातील क्रांतिकारी नेते आणि नंतरचे कॉमनवेल्थ व्हर्जिनियाचे गव्हर्नर पॅट्रिक हेन्री इत्यादींचा वावर या ठिकाणी होता. अमेरिकेच्या लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्क आदी मूल्यांची बीजे इथे सापडतात. इथे 1776 मध्ये झालेल्या अधिवेशनात म्हणूनच व्हर्जिनिया डिक्लेरेशन ऑफ राईटस् जाहीर करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रत्येकाला स्वातंत्र्य आणि काही मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित करण्यात आले. प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार असल्याचे प्रथमच मान्य करण्यात आले. जगण्याचा, व्यक्तिगत सुरक्षेचा व कायद्यासमोर सर्व समान असल्याचा निर्वाळाही यात देण्यात आला. नंतर अमेरिकेचे जे बिल ऑफ राईटस् मंजूर झाले, त्याची ही नांदी म्हणता येईल. या बिल ऑफ राईटस्द्वारे घटनेतील पहिल्या दहा दुरुस्त्या केल्या गेल्या. व्यक्तिगत नागरी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य, माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने सरकारला निवेदन देण्याची मुभा आदींचा यात समावेश होता. त्यामुळे व्हर्जिनिया डिक्लेरेशनला विशेष महत्त्व आहे. या राजधानीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विल्यम आणि मेरी कॉलेजची 1693 मध्ये झालेली स्थापना. अजूनही हे अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठ मानले जाते. येथील रेन बिल्डिंग सर्वात जुनी असून, ती अद्याप वापरात आहे. येथील गव्हर्नर पॅलेसही अवश्य पाहण्यासारखी वास्तू आहे. 1780 नंतर व्हर्जिनियाची ही राजधानी विल्यम्सबर्ग येथून रिचमंडला हलविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news