व्यक्‍तिचित्र : मेक्सिकोतील महिलाराज

व्यक्‍तिचित्र : मेक्सिकोतील महिलाराज

[author title="आरती आर्दाळकर-मंडलिक, फ्रिस्को (टेक्सास), अमेरिका" image="http://"][/author]

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका, कॅनडा व मेक्सिको या प्रमुख देशांत प्रथम महिला अध्यक्ष होण्याचा मान पटकावून क्लॉडिया शेनबॉम यांनी एक नवीन इतिहास रचला आहे. मेक्सिकोचे नेतृत्व करणे हे एवढे सोपे काम नाही. त्यामुळे क्लॉडिया यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे; पण तरीही त्यांच्यासारख्या महिला पुढे येऊन नेतृत्व करीत आहेत, हे खूप आशादायी आहे.

सध्या जगात बहुतांश देशांत निवडणुकीचे वारे वाहत आहे. भारत, अमेरिका यासारख्या बड्या देशांच्या निवडणुकांवर सर्व जगाचे लक्ष लागून आहे; पण या सगळ्यात एका देशाच्या निवडणुकीचा निकाल लक्षवेधी लागला, तो म्हणजे मेक्सिको. खरे तर इतरवेळी कोणालाही या देशाच्या निकालाचे एवढे विशेष वाटले नसते. परंतु, यावेळेस मेक्सिकोमध्ये पहिल्यांदाच एक महिला राष्ट्राध्यक्ष झाली आहे. क्लॉडिया शेनबॉम असे त्यांचे नाव आहे. त्या एकसष्ट वर्षांच्या असून, एक पर्यावरण शास्त्रज्ञ व मेक्सिको सिटीच्या माजी महापौर आहेत. तसेच ज्यू पार्श्वभूमी असलेली व्यक्ती पहिल्यांदाच अध्यक्षपदावर निवडून आलेली आहे. जगातील रोमन कॅथॉलिक लोकसंख्या असणारा मेक्सिको हा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. मेक्सिकोसारख्या पुरुषसत्ताक देशात एका महिलेने सर्वोच्च पद मिळवणे हे खास आहेच; पण उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका, कॅनडा व मेक्सिको या प्रमुख देशांत प्रथम महिला अध्यक्षा होण्याचा मान क्लॉडिया यांनी पटकावून एक नवीन इतिहास रचला आहे. मेक्सिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांत 58.3 टक्के व 60.7 टक्के एवढ्या प्रचंड मताधिक्याने त्या विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी एक महिलाच होत्या. त्यांना केवळ 28 टक्के मते मिळालीत. स्वतंत्र मेक्सिकोच्या इतिहासातील ही सर्वात जास्त टक्केवारी होती. मावळते राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ यांच्या त्या राजकारणातील उत्तराधिकारी मानल्या जातात. लोपेझ हे गरिबांत खूप लोकप्रिय आहेत, त्याचा फायदा क्लॉडिया शेनबॉम यांना झाला, असे म्हटले जाते.

कोण आहेत क्लॉडिया शेनबॉम?

24 जून 1962 रोजी एका धर्मनिरपेक्ष ज्युईश कुटुंबात क्लॉडिया यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील शास्त्रज्ञ होते. 1920 मध्ये त्यांचे आजी-आजोबा नाझी भीतीतून बल्गेरिया हा आपला देश सोडून मेक्सिकोमध्ये वास्तव्यास आले. त्यामुळे त्यांच्यावर ज्यू संस्कार आहेत. क्लॉडिया शेनबॉम यांनी भौतिकशास्त्रामध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीमधून ऊर्जा अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. 1991 ते 1994 या काळात त्यांनी आपल्या डॉक्टरेटच्या शोधनिबंधाचे काम कॅलिफोर्नियातील लॅरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरीमध्ये पूर्ण केले. ऊर्जेशी संबंधित त्यांनी जवळपास शंभर लेख व दोन पुस्तके लिहिली. 2018 मध्ये 'बीबीसी'ने जाहीर केलेल्या जगातील शंभर प्रभावी महिलांमध्ये क्लॉडिया यांचा समावेश होता.

राजकीय कारकीर्द

मेक्सिको विद्यापीठात असताना क्लॉडिया शेनबॉम विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सदस्य झाल्या. सन 2000 मध्ये मेक्सिको सिटीच्या पर्यावरण सेक्रेटरी म्हणून त्यांची नेमणूक झाली. 2006 पर्यंत त्यांनी ते पद सांभाळले. त्याकाळात त्यांनी मेक्सिको सिटीच्या इलेक्ट्रिक कार नोंदणी सेंटरचे काम केले. तसेच मेट्रो बस व सिटीच्या रिंग रोडच्या दुसर्‍या टप्प्याची आखणी व बांधणी केली. 2012 मध्ये मावळते अध्यक्ष लोपेझ यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत संभाव्य पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती सेक्रेटरी म्हणून त्यांना सहभागी करून घेतले. तिथूनच क्लॉडिया यांच्यावर लोपेझ यांचा प्रभाव वाढू लागला. त्या त्यांना आपले राजकीय गुरू मानत. लोपेझ यांच्या स्पिलन्टर चळवळीतही त्यांनी काम केले. पुढे 2018 ते 2023 पर्यंत त्या मेक्सिको सिटीच्या महापौर होत्या. ते पद भूषविणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या.

2019 मध्ये त्यांनी सहा वर्षांच्या पर्यावरणपूरक योजना आखल्या. त्यामध्ये 30 टक्क्यांपर्यंत वायुप्रदूषण कमी करणे, 15 दशलक्ष झाडे लावणे, प्लास्टिकवर बंदी, सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, अशा अनेक योजना होत्या. याशिवाय 2019 मध्येच त्यांनी जेंडर न्यूट्रल युनिफॉर्म पॉलिसी काढली. त्यानुसार मुला-मुलींना आपल्या जेंडरनुसार गणवेश घालायची सक्ती करता येणार नव्हती. वसाहतवादाविरोधी चळवळीचा भाग म्हणून त्यांनी 2021 मध्ये मेक्सिको सिटीमधून ख्रिस्तोफर कोलंबसचा पुतळा काढून टाकला.

मेक्सिकोमधील महिला

स्पेनने तीनशे वर्षे राज्य केल्यानंतर 27 सप्टेंबर 1821 रोजी मेक्सिको स्वतंत्र झाला. लोकशाही अस्तित्वात आली; पण महिलांना मतदानाचा हक्क मिळायला 1953 साल उजाडावे लागले. जवळपास सर्वच देशांतील महिलांना आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा लागला आहे. मेक्सिको तर पहिल्यापासूनच पुराणमतवादी व पुरुषप्रधान देश आहे. अजूनही तिथे लिंग असमानता आहे. स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. महिला तिथे असुरक्षित आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे, अजूनही दर तासाला एक महिला गायब होते व दररोज सुमारे दहा महिलांचे खून होतात. 90 टक्के मेक्सिकन लोक स्त्रियांविरुद्ध नकारात्मक पक्षपात करतात आणि 58 टक्के महिला राजकारण्यांविरुद्ध पूर्वग्रह बाळगतात; तरीही महिला नेत्याची निवड करणारे मेक्सिको हे पहिले उत्तर अमेरिकन राष्ट्र ठरले आहे. देशाच्या काही महत्त्वाच्या पदांवर महिला आहेत. जसे की, संसदेची दोन्ही सभागृहे, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग. देशाच्या संसदेत जवळपास अर्ध्या महिला आहेत. तर बत्तीसपैकी तेरा राज्यांच्या मुख्यमंत्री महिला आहेत. ही खूप आशेची बाब आहे; पण हे एका दिवसात झालेले नाही. 1996 मध्ये संसदेत किमान 30 टक्के महिला असाव्यात, असा शिफारस करणारा कायदा मंजूर झाला; पण त्यामध्ये काही पळवाटा होत्या, ज्यामुळे पुन्हा महिला मागे राहिल्या व पुरुषच निवडून येऊ लागले. त्यावेळी काही महिलांनी न्यायालयात दाद मागितली. निकाल त्यांच्या बाजूने लागला. तेव्हापासून गोष्टी वेगाने बदलल्या. मेक्सिकन काँग्रेसमध्ये 2011 मध्ये 26 टक्के महिला होत्या, 2015 मध्ये 42 टक्के आणि परवाच्या निवडणुकीत ते प्रमाण 48 टक्क्यांपर्यंत गेले.

क्लॉडिया शेनबॉम यांच्यासमोरील आव्हाने

'हा माझ्या एकटीचा विजय नाही, तर प्रत्येक महिलेचा विजय आहे. देशाच्या उभारणीमध्ये ज्या ज्या महिलांचा सहभाग आहे, त्या सगळ्या माझ्यासोबत निवडून आल्या आहेत,' असे मत क्लॉडिया शेनबॉम यांनी व्यक्त केले आहे. मेक्सिकोमधील महिला देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवीत असल्या, तरी अजून तळागाळातील, गावातील, स्थानिक महिला उपेक्षितच आहेत. त्यांना समान वागणूक देण्याचे, न्याय देण्याचे आव्हान क्लॉडिया यांच्यासमोर आहे. मावळते अध्यक्ष व क्लॉडिया शेनबॉम यांचे गुरू लोपेझ हे महिलांच्या हक्कांविषयी एवढे आग्रही नव्हते, क्लॉडिया आता सत्तेत येऊन त्यांचेच धडे गिरवणार का? याबद्दल मेक्सिकोमधील महिला साशंक आहेत.

मेक्सिकोसारख्या देशाचे नेतृत्व करणे हे एवढे सोपे काम नाही. क्लॉडिया शेनबॉम यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे; पण तरीही त्यांच्यासारख्या महिला पुढे येऊन नेतृत्व करीत आहेत, हे खूप आशादायी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news