समाजभान : पालकांच्या बदलत्या भूमिका

समाजभान : पालकांच्या बदलत्या भूमिका

[author title="डॉ. मनीषा गावडे" image="http://"][/author]

आजच्या धावपळीच्या युगात मुलांच्या पालनपोषणात पालक, आजी-आजोबा यांच्या मोलाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरीही ते मुलांच्या विकासातील आधारस्तंभ आहेत. नोकरदार असो किंवा घरात राहणारे असोत, आई-वडील, आजी-आजोबांनी मुलांसमवेत महत्त्वाचा वेळ व्यतीत करणे हे त्यांच्या बौद्धिक विकास आणि सर्वंकष प्रगतीसाठी आवश्यक आहे. आयुष्याच्या धावपळीत अनेक पालक विशेषत: नोकरदार असलेल्या मातांना आपण मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे शल्य सतत बोचत असते; पण मुलांसमवेत किती वेळ व्यतीत केला हे महत्त्वाचे नसून, तो वेळ किती मौलिक होता, हे महत्त्वाचे आहे.

किशोरावस्था हा मुलांसाठी महत्त्वाचा कालावधी आहे आणि या काळात त्यांच्यात अत्यंत वेगाने शारीरिक आणि भावनात्मक बदल होत असतात. या संवेदनशील काळात पालकांनी आपल्या मुलांच्या आहाराकडे आणि सर्वंकष विकासाकडे लक्ष देणे गरजेचे असते. आईच्या अंगी मुलांचे कौशल्य ओळखून त्यांचे पोषण करणे आणि त्यांच्यातील उणिवा दूर करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाची अद्वितीय क्षमता असते. मुलांची तुलना त्यांचे सहकारी किंवा समवयस्क मुलांशी आणि अवास्तव निकषांशी करू नये. परिणामी, मुलांचा आत्मविश्वास ढळू शकतो. याउलट त्यांच्या व्यक्तिगत कामगिरीचा आनंद व्यक्त करायला हवा. शैक्षणिकसह अन्य आव्हानांतून बाहेर काढण्यासाठी मदत करणे यासारख्या गोष्टी त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यास उपयुक्त ठरू शकतात. मुक्त संवाद हा पालक आणि मुलांच्या निकोप संबंधांचा आधार आहे.

आजी-आजोबांची नातवंडांच्या पालनपोषणात महत्त्वाची भूमिका असते. आजी-आजोबांची तत्त्वे, निष्ठा आणि आयुष्यातील अनुभव हे मुलांच्या मनात वेगळा द़ृष्टिकोन निर्माण करू शकतात. नातू-नातीसमवेत वेळ व्यतीत करणे, गोष्टी सांगणे आणि त्यांच्या आयुष्यात सहभागी होत अधिकाधिक प्रेम देणे, पाठबळ देणे, त्यांच्या उपक्रमात सहभागी होणे, या गोष्टी मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम करत असतात. अर्थात, मुलांचा सांभाळ आणि संगोपनासमोर अनेक आव्हाने आहेत. विशेषत:, आधुनिक काळात सर्वात मोठा अडथळा 'ट्रिपल पी'चे (तीन दबाव) व्यवस्थापन करण्याचा आहे. पालकांचा दबाव, सहकार्‍यांचा दबाव आणि कामगिरीचे ओझे यासारखे दडपण मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि सर्वंकष विकासावर सखोल परिणाम करू शकतात.

आई-वडिलांचा दबाव हा नेहमीच शैक्षणिक कामगिरी आणि भविष्यातील यशासंदर्भात पराकोटीच्या अपेक्षा निर्माण करणार्‍या असतात. अर्थात, या अपेक्षा मुलांना प्रेरित करू शकतात. मात्र, पाठबळ आणि समंजसपणा यात संतुलन साधले गेले नाही, तर तो अनुचित प्रकारचा तणाव निर्माण करू शकतो. दुसरीकडे, सहकार्‍यांचा दबाव हा सामाजिक अपेक्षा आणि व्यवहाराला अनुरूप होण्यासाठी प्रभाव निर्माण करू शकतात. त्यामुळे कधी कधी जोखमीच्या कृत्याला प्रवृत्त केले जाते किंवा आत्मविश्वास ढळणे यासारखे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. कामगिरीचा दबाव हा आणखी एक महत्त्वाचा पैलू. इथे मुलांना खेळ, शैक्षणिक अभ्यास आणि अभ्यासेतर अन्य क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याची अनिवार्यता सांगतो.

यात सोशल मीडियाच्या प्रभावाला कमी लेखता येणार नाही. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर तसेच नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओसारखी ओटीटी सेवा आता तरुणांचा अविभाज्य घटक बनली आहे. त्याचवेळी हे प्लॅटफॉर्म मनोरंजन आणि सामाजिक संपर्काची संधी उपलब्ध करून देतात. सायबर बुलिंग, अनुचित बाबींच्या संपर्कात आल्याने आणि अवास्तव तुलना केली जात असल्याने या बाबी मुलांच्या जीवनात जोखीम निर्माण करतात. पालकांनी मुलांच्या ऑनलाईन हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यांना जबाबदारीने त्याचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सोशल नेटवर्किंग साईटवरून वापरली जाणारी सामग्री आणि त्यांचा मानसिक आरोग्य आणि विकासावरील संभाव्य परिणामासंदर्भात खुलेपणाने चर्चा करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news