भारत-बांगला देश मैत्रीबंध

भारत-बांगलादेश मैत्री: नवे पर्व
India-Bangladesh friendship
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी.Pudhari File Photo
प्रा. सतीश कुमार

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणामध्ये बांगला देश हा महत्त्वाचा देश आहे. सलग पाचव्यांदा पंतप्रधान बनलेल्या शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत-बांगला देश संबंध घनिष्ट होत गेले आहेत. अलीकडेच झालेल्या त्यांच्या भारत दौर्‍यामुळे ते आता नव्या उंचीवर पोहोचणार आहेत. या दौर्‍यादरम्यान झालेल्या दहा करारांमुळे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

India-Bangladesh friendship
ऐतिहासिक ठाणे कारागृह पाडण्यास केळकर- आव्हाडांचा विरोध

पंतप्रधान शेख हसीना यांचा भारत दौरा

बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दोनदिवसीय भारत दौर्‍याने दोन्ही देशांमधील संबंध कालपरत्वे अधिक घनिष्ट बनत चालल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांदरम्यान 10 करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला तो तिस्ता नदीच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी भारताकडून तांत्रिक टीम पाठवण्याच्या प्रस्तावावरचा करार. भारताच्या शेजारील देशांमध्ये हस्तक्षेप वाढवण्याच्या चिनी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही संमती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

India-Bangladesh friendship
मराठा आरक्षणाबाबत 10 दिवसांत मिळणार मोठी बातमी

तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा

तिस्ता नदीच्या पाणीवाटपाचा मुद्दा दोन्ही देशांमधील गुंतागुंतीचा मानला जातो. 2011 मध्येच दोन्ही देशांमध्ये तिस्ता पाणीवाटपाचा फॉर्म्युला मान्य झाला होता; परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधामुळे ही चर्चा पुढे सरकू शकली नाही. या पार्श्वभूमीवर चीनने 2020 मध्ये तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यात स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली. यासंबंधी भारताने आक्षेप घेतल्यानंतर चीनला या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात आली. तथापि, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ढाक्यातील चीनच्या राजदूताने पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. तसेच चीनने बांगला देशला सुधारित प्रस्ताव पाठवला असून, त्यात या नदीजल व्यवस्थापनासाठीचा खर्च पूर्वीपेक्षा कमी दाखवण्यात आला आहे. श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांची उदाहरणे पाहिली, तर चीनने घेतलेल्या या भूमिकेमध्ये नावीन्य काहीच नाही किंवा नवल वाटण्याचे कारण नाही. भारताच्या शेजारी देशांना काहीही करून आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो, हे अलीकडील काळात आपण पाहिले आहे. तथापि, भारताचे बांगला देशाशी असलेले घनिष्ट संबंध पाहता तिस्ता पाणीवाटपावरून निर्माण झालेले मतभेद हे दोन्ही देशांत संशय व अविश्वासाला वाव देणारे नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या पातळ्यांवर द्विपक्षीय चर्चेद्वारे याबाबत एक सूत्र ठरवण्यात आले आणि त्यानुसार समान हितसंबंधांच्या मुद्द्यांमध्ये तृतीय पक्षांना प्रवेश देणे योग्य नाही, असे ठरवण्यात आले. तिस्ता नदीच्या संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमधील हे सामंजस्य किंवा सामायिक विचारसरणीवर आधारित भूमिका ताज्या करारातून दिसून आली. या करारानुसार, भारताची टेक्निकल टीम बांगला देशात जाणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे, पावसाळ्यात येणारे अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्यासाठी खरोखरच जलाशय बांधण्याची गरज आहे का, या प्रश्नावरही ही टीम विचार करणार आहे. असाच प्रस्ताव चीनने बांगला देशला दिल्याचे समजते.

भारत-बांगला देश यांच्यातील डिजिटल भागीदारी वाढणार

याखेरीज या दौर्‍यादरम्यान आर्थिक, व्यापारी करारांवरही स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या करारांमुळे भारत-बांगला देश यांच्यातील डिजिटल भागीदारी वाढणार आहे. भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणामध्ये बांगला देशला महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या नकाशावर बांगला देशचा उदय भारताच्या प्रयत्नांमुळे झाला. 16 डिसेंबर 1971 ही तारीख जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे, जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या संसदेत पूर्व पाकिस्तान आता बांगला देश हे नवीन राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्याची घोषणा केली होती. भारतीय लष्कराने आपले शौर्य आणि पराक्रम दाखवून नवा देश उभा केला आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रपिता म्हणवणारे बंग बंधू स्व. शेख मुजीबूर रहमान यांनी ज्या यातना सहन केल्या आणि त्यांनी आपल्या देशातील लोकांना पाकिस्तानच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्या प्रकारे प्रेरित केले, त्या आठवणी येणार्‍या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देतील. बांगला देश मुक्तिसंग्राम खरे तर धर्माच्या नावाखाली कोणताही देश कायमस्वरूपी अस्तित्वात राहू शकत नाही, याची आठवण करून देणारा होता. शेख मुजीबूर रहमान यांनीच आपल्या देशाच्या बंगाली संस्कृतीच्या आधारे नवा धर्मनिरपेक्ष बांगला देश निर्माण केला. शेख हसीना या त्यांच्या कन्या आहेत. बांगला देशने आपल्या स्थापनेपासून अनेक चढ-उतार पाहिले आहेत; परंतु भारताशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. तरीही यावेळच्या दौर्‍याला विशेष महत्त्व होते. कारण, दक्षिण आशियाच्या राजकारणात चीनच्या प्रभावामुळे काही भारतविरोधी बदल घडताना दिसत आहेत. या बदलांशी भारताला जुळवून घ्यावे लागत आहे.

बांगला देशच्या आर्थिक विकासात भारताचे योगदान

बांगला देशच्या आर्थिक विकासात भारताचे योगदान मोठे आहे. बांगला देश हा एक मजबूत लोकशाही सार्वभौम देश बनला पाहिजे आणि बंगालच्या उपसागरातील त्याच्या सीमा मजबूत राहाव्यात, यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. 2008 पासून शेख हसीना यांच्या राजवटीत बांगला देशने आर्थिक प्रगतीत विशेष स्थान प्राप्त केले आहे आणि आर्थिक विकासाचा दरही वृद्धिंगत होत आला आहे. आजघडीला विकसनशील देशांमध्ये बांगला देशाचा आर्थिक विकास हा अनेक द़ृष्टिकोनातून उल्लेखनीय मानला जातो. अशा देशाबरोबर भारताने एक समन्वित आर्थिक भागीदारी सहकार्य करार केला आहे. दोन्ही देश परस्पर व्यापार आणि व्यवसाय वाढवण्यासाठी उत्सुक असल्याने भारताने रंगपूरमध्ये व्हाईस कॉन्सुलेटही उघडणार असल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापार कोणत्याही वादविवादांविना वाढत आहे, ही बाब यामध्ये उल्लेखनीय आहे. भारत बांगला देशला आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे, तसेच तेल, वायू आणि वीज क्षेत्रात ऊर्जा सहकार्य करत आहे. यासंदर्भात समन्वित आर्थिक सहकार्य खूप फायदेशीर ठरणार आहे.

2023 पासून शेख हसीना यांची भारताला तिसर्‍यांदा भेट

शेख हसीना यांनी चालू वर्षाच्या सुरुवातीपासून आपल्या पंतप्रधानपदाचा पाचवा कार्यकाळ सुरू केला आहे. यानंतर हसीना यांचा हा पहिलाच परदेश दौरा होता. सप्टेंबर 2023 पासून त्यांनी भारताला तिसर्‍यांदा भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा सत्तेवर आल्यानंतर भारताला राजकीय भेट देणार्‍या त्या पहिल्याच परदेशी पाहुण्या आहेत. यावरून दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांना बांगला देशकडून दिले जात असलेले महत्त्व अधोरेखित होते. भारत बांगला देशकडे भारतीय उपखंडातील एक शक्ती म्हणून पाहतो. यामुळेच बांगला देश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, तर भारत संपूर्ण आशियातील बांगला देशचा दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे. बांगला देशातून भारतात दरवर्षी दोन अब्ज डॉलरची निर्यात होते. त्याचप्रमाणे बांगला देशही भारतातून मोठ्या प्रमाणात आयात करतो. या भागातील लोकांच्या आर्थिक विकासात या भागीदारीला विशेष स्थान आहे. ताज्या करारांमुळे दोन्ही देश परस्परांच्या आर्थिक विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न करणार आहेत. हरित भागीदारी, डिजिटल भागीदारी, नील अर्थव्यवस्था, अंतराळ अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्याबाबत झालेल्या सहमतीचा लाभ दोन्ही देशांमधील तरुण पिढीला मिळणार आहे. भारत-बांगला देश मैत्री दोन्ही देशांमधील संबंधांना नवी उंची देणारी ठरणार आहे. बांगला देशातील सिराजगंजमध्ये एका अंतर्देशीय कंटेनर डेपोच्या निर्मितीसाठी भारत मदत करणार आहे. वैद्यकीय उपचारांसाठी बांगला देशातून भारतात येणार्‍या लोकांसाठी भारत ई-वैद्यकीय व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. त्यामुळे शेख हसीनांच्या दौर्‍यामुळे येणार्‍या काळात दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर पोहोचलेले दिसतील, यात शंका नाही. चीनचे भारतीय उपखंडातील विस्तारवादी धोरण पाहता, बांगला देशशी संबंध उत्तम ठेवणे ही आज भारताचीही गरज आहे. शेख हसीना पुढील महिन्यात चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. बांगला देशचे चीनशीही चांगले आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत; पण बांगला देश इतर देशांशी आपली जवळीक निर्माण करताना आणि वाढवताना भारताच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देत नाही. हेच या मैत्रीसंबंधांचे सार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news