Weight Loss Gender Differences AI-generated image
आरोग्य

Weight Loss Gender Differences : पुरुष महिलांपेक्षा वेगाने वजन कमी करतात का? काय सांगते विज्ञान?.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये लठ्ठपणामुळे अकाली आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त

पुढारी वृत्तसेवा

Weight Loss Gender Differences : तुम्ही कधी नोटीस केलंय का? एखादा पुरुष आणि स्त्री एकत्र वजन कमी करायला सुरुवात करतात, तेव्हा पुरुषांचं वजन सुरुवातीला खूप वेगाने कमी होतं; पण असं का होतं? पुरुष महिलांपेक्षा डाएट आणि कॅलरीजबाबत अधिक सजग असतात? तर तसं अजिबात नाही! मग यामागील नक्की कोणती जैविक आणि सवयींशी संबंधित कारणे आहेत? याबाबत जाणून घेऊया...

पुरुषांमध्ये स्नायूंचे प्रमाण अधिक

'द ओबेसिटी सोसायटी'च्या प्रवक्त्या आणि वॉशिंग्टन येथील 'रिव्होल्यूशन मेडिसिन, हेल्थ अँड फिटनेस'च्या वैद्यकीय संचालिका डॉ. रिचेले कोराडो सांगतात की, "याचे मुख्य कारण म्हणजे पुरुषांमध्ये स्नायूंचे (Muscles) प्रमाण जास्त असते, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अधिक कॅलरीज खर्च होतात. जेव्हा पुरुष आणि स्त्रिया एकाच प्रकारचा आहार घेतात, तेव्हा पुरुषांच्या शरीरात कॅलरीजची मोठी तूट (कमी) निर्माण होते. परिणामी, वजन कमी करण्याच्या सुरुवातीच्या काळात पुरुषांचे वजन अधिक वेगाने घटते."

पुरुषांचे वजन महिलांपेक्षा वेगाने कसे कमी होते?

पुरुषांचे वजन महिलांच्या तुलनेत वेगाने कमी होते यामागे निसर्गाने पुरुषांना दिलेली शारीरिक आणि जैविक देणगी कारणीभूत आहे. पुरुषांची शरीराची ठेवणच अशी असते, जी त्यांना वजन वेगाने कमी करण्यास नैसर्गिकरीत्या मदत करते. यामागचं मुख्य कारण म्हणजे, पुरुषांच्या शरीरात चरबी नसलेल्या स्नायूंचे प्रमाण जास्त असते. स्नायूंचे वैशिष्ट्य असे की, आपण काहीही काम न करता अगदी शांत विश्रांती घेत असलो, तरीही ते शरीरातील चरबीच्या तुलनेत खूप जास्त कॅलरीज जाळत असतात. संशोधनानुसार, "स्नायूंच्या या खास वैशिष्ट्यामुळे पुरुष अगदी शांत बसलेले असतानाही, दिवसभरात महिलांपेक्षा जास्त कॅलरीज सहज जाळू शकतात."

'या' २ गोष्टींमुळे पोटावरची चरबी भराभर वितळते!

वजन कमी करताना पुरुषांच्या शरीरातील अंतर्गत रचना आणि त्यांचे हार्मोन्स त्यांना खूप मोठी मदत करतात. यामागे प्रामुख्याने दोन महत्त्वाची कारणे आहेत: पुरुषांच्या शरीरात चरबी प्रामुख्याने पोटाच्या भागात म्हणजेच अंतर्गत अवयवांच्या भोवती साठते. वैज्ञानिक भाषेत याला 'व्हिसेरल फॅट' म्हणतात. ही पोटाची चरबी आरोग्यासाठी अत्यंत घातक असली, तरी ती चयापचय दृष्ट्या (Metabolically) खूप जास्त सक्रिय असते. याचा फायदा असा होतो की, जेव्हा पुरुष डाएट किंवा व्यायाम सुरू करतात, तेव्हा ही पोटावरची चरबी इतर भागांतील चरबीपेक्षा खूप वेगाने वितळू लागते.

'टेस्टोस्टेरॉन' हार्मोनची कमाल

पुरुषांच्या बाजूने काम करणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरात असणारे 'टेस्टोस्टेरॉन' हे हार्मोन. पुरुषांमध्ये या हार्मोनचे प्रमाण जास्त असते. हे हार्मोन शरीरातील स्नायू मजबूत ठेवण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज जास्त प्रमाणात आणि वेगाने जळतात.

महिलांना वजन कमी करण्यात का येतात अडचणी?

पुरुषांना वजन कमी करताना जे नैसर्गिक फायदे मिळतात, ते महिलांना मिळत नाहीत. महिलांच्या शरीराची रचना आणि त्यामधील हार्मोन्सचे कार्य पुरुषांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. वास्तविक पाहता, महिलांचे शरीर जैविक दृष्ट्या (Biologically) चरबी साठवून ठेवण्यासाठीच बनलेले असते. त्यांच्या प्रजनन काळात (Reproductive Years) म्हणजेच बाळंतपण आणि मातृत्वासाठी हा गुणधर्म महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. परंतु, वय ५० वर्षांनंतर जेव्हा महिलांमध्ये 'मेनोपॉज' (रजोनिवृत्ती किंवा मासिक पाळी बंद होणे) चा काळ येतो, तेव्हा त्यांच्या शरीरातील चरबीची जागा बदलते. मेनोपॉजनंतर शरीराचे संतुलन बदलल्यामुळे महिलांना वजन कमी करणे खूप जास्त कठीण होऊन बसते.

हार्मोन्सचाही मोठा वाटा

शारीरिक रचनेसोबतच भुकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सचाही यात मोठा वाटा असतो. आहारतज्ज्ञांच्या मते, "शरीरात भूक नियंत्रित करणारे 'लेप्टिन' (Leptin) आणि 'घ्रेलीन' (Ghrelin) हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स असतात. पुरुष आणि स्त्रियांमध्ये या हार्मोन्सच्या कामाची पद्धत वेगळी असते. पुरुषांच्या शरीरात हे हार्मोन्स अशा प्रकारे काम करतात, ज्यामुळेच त्यांना वजन कमी करणे सोपे जाते, तर महिलांच्या बाबतीत हे काहीसे आव्हानात्मक ठरते."

महिलाही कमी करू शकतात पुरुषांइतकेच वजन!

शारीरिक रचनेसोबतच खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळेही महिलांना वजन कमी करताना जास्त कसरत करावी लागते. संशोधनातून यामागील काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये 'इमोशनल ईटिंग' (म्हणजेच ताणतणाव, दुःख किंवा अतिआनंद अशा भावनांच्या भरात जास्त खाणे) आणि 'हेडोनिक ईटिंग' (म्हणजेच भूक नसतानाही केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा तात्पुरत्या आनंदासाठी खाणे) चे प्रमाण जास्त असते. या मानसिकतेमुळे महिला अनेकदा गोड, तेलकट, तुपकट किंवा जंक फूडकडे जास्त आकर्षित होतात. साहजिकच यामुळे वजन कमी करण्याच्या त्यांच्या प्रवासात मोठे आव्हान निर्माण होते.

महिलांसाठी वजन कमी करणे अशक्य नाही!

जरी पुरुष आणि महिलांच्या शरीराची रचना वेगळी असली आणि सुरुवातीला पुरुष वेगाने वजन कमी करत असले, तरी महिलांनी निराश होण्याची अजिबात गरज नाही. कारण हे लक्ष्य गाठणे महिलांसाठी अशक्य नक्कीच नाही. एका महत्त्वपूर्ण अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा पुरुष आणि महिला दोघेही योग्य डाएट प्लॅन पाळतात आणि कॅलरीजवर नियंत्रण ठेवतात, तेव्हा दोघेही त्यांच्या शरीराच्या एकूण वजनाच्या ५% वजन जवळपास सारख्याच गतीने कमी करतात. वजन कमी करण्यात सुरुवातीला पुरुषांची गाडी सुसाट सुटली, तरी योग्य जिद्द, आहार आणि व्यायामाच्या जोरावर महिलाही पुरुषांच्या बरोबरीने उत्तम प्रकारे वजन कमी करू शकतात!

'वेट लॉस' सुरू करण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला का हवा?

वजन कमी करण्याच्या या संपूर्ण प्रवासात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे फक्त वजन काट्यावरील आकडा कमी करणे हे आपले ध्येय नसावे. खरे उद्दिष्ट हे तुमच्या शरीरासाठी जे वजन निरोगी आणि योग्य आहे, ते गाठणे आणि ते नेहमी टिकवून ठेवणे हे आहे. सामान्यतः चांगल्या आरोग्यासाठी आणि निरोगी वजनासाठी 'बॉडी मास इंडेक्स' (BMI) चा आधार घेतला जातो. जर तुमचा BMI १८.५ ते २४.९ च्या दरम्यान असेल, तर तुमचे वजन योग्य मानले जाते.

वजन कमी करण्यात हार्मोन्सची भूमिका

वजन कमी करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांच्या बाबतीत, इस्ट्रोजेनची कमी होणारी पातळी काही प्रमाणात जबाबदार असते, पण पूर्णपणे नाही. 'स्टडी ऑफ वुमेन्स हेल्थ अक्रॉस द नेशन' (SWAN) सारख्या महत्त्वाच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, केवळ मेनोपॉज नाही, तर वाढते वय हे मध्यमवयात वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. "वय वाढणे आणि स्नायू कमी होणे यामुळे ५० वर्षांवरील महिलांचा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट कमी होतो."जरी इस्ट्रोजेनची कमतरता हे एकमेव कारण नसले तरी, त्याचा तुमच्या डाएट आणि व्यायामाच्या प्रतिसादावर नक्कीच परिणाम होतो. पेरीमेनोपॉज (पाळी बंद होण्यापूर्वीचा काळ) दरम्यान इस्ट्रोजेन कमी होऊ लागल्याने महिलांचे स्नायू कमी होतात, पोटाची चरबी वाढते आणि चयापचयात असे बदल होतात ज्यामुळे वजन कमी होण्याचा वेग मंदावतो.

महिलांसाठी एक दिलासा

सुरुवातीच्या काही संशोधनातून वजन कमी करणाऱ्या नवीन औषधांबाबत (उदा. Semaglutide आणि Tirzepatide) महिलांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 'जर्नल ऑफ डायबिटीस' मधील मागील अभ्यासांच्या विश्लेषणानुसार, ज्या महिलांनी 'GLP-1' गटातील औषधे घेतली, त्यांनी हीच औषधे घेणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत सरासरी जास्त वजन कमी केले."महिला या औषधांना जास्त चांगला प्रतिसाद का देतात, याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही, पण काही संभाव्य कारणे असू शकतात." महिलांचे शरीराचे वजन साधारणपणे कमी असते, त्यामुळे समान डोस दिला तरी त्यांच्या शरीरात औषधाचे प्रमाण जास्त प्रभावी ठरू शकते. याशिवाय, काही अभ्यासांनुसार असेही दिसते की, वजन कमी होण्याचा वेग थांबण्यापूर्वी महिला दीर्घकाळापर्यंत वजन कमी करत राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT