

Men's Health News : 'लैंगिक आरोग्य' हा शब्द उच्चारताच आजही अनेकांच्या भुवया उंचावतात. त्यातही 'इरेक्टाइल डिस्फंक्शन' Erectile Dysfunction (लिंगाच्या ताठरतेशी संबंधित समस्या) हा तर केवळ थट्टा-मस्करीचा किंवा चारचौघांत बोलूच नये असा विषय मानला जातो. अनेकदा या समस्येचा संबंध 'पुरुषत्वाशी' संबंध जोडला जात असल्याने पुरुष यावर उघडपणे बोलणं टाळतात; पण आधुनिक जगात झालेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणांनुसार, वयाची चाळीशी ओलांडलेल्या निम्म्याहून अधिक पुरुषांना या समस्येचा त्रास होतो. तरीही, सामाजिक भीतीपोटी यावर मौन बाळगलं जातं. पुरुषांचं हेच मौन आता त्यांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पुरुषांचे लैंगिक आरोग्य हे त्यांच्या एकूणच शरीराचे आरोग्यदर्शक असते. कारण 'इरेक्टाइल डिस्फंक्शन' ही केवळ एक तात्पुरती समस्या नसून, ती शरीरात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांची नांदी असू शकते. यामध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका, मधुमेह , पक्षाघात आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या जीवघेण्या आजारांचे सुरुवातीचे संकेत या समस्येतून मिळू शकतात. त्यामुळेच, आता वेळ आली आहे की रुग्ण आणि डॉक्टर दोघांनीही या विषयाकडे निव्वळ एक 'लैंगिक समस्या' म्हणून न पाहता, संपूर्ण आरोग्याचा इशारा म्हणून गांभीर्याने पाहावे, असे संशोधक सांगतात.
'बीबीसी' रिपोर्टनुसार, इटलीतील रोम येथील 'टोर वर्गाटा' विद्यापीठातील लैंगिक समस्यांचे तज्ज्ञ (सेक्सोलॉजिस्ट) इमॅन्युएल जनिनी यांच्या मते, पुरुषांमधील इरेक्टाइल डिस्फंक्शन (लिंगाच्या ताठरतेची समस्या) म्हणजे शरीरात येणाऱ्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना असते. जुन्या काळात खाणीतील विषारी वायूचा अंदाज घेण्यासाठी 'कॅनरी' नावाचा पक्षी सोबत ठेवला जायचा. हा पक्षी धोक्याचे संकेत आधीच देत असे, आता लिंगाची ताठरता ही समस्या सुद्धा अगदी तशीच काम करते. जनिनी यांनी नुकत्याच केलेल्या एका मोठ्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जर डॉक्टरांनी या समस्येची वेळीच आणि योग्य तपासणी केली, तर पुरुषांच्या शरीरात भविष्यात वाढणाऱ्या अनेक गंभीर आजारांचे निदान ते बळावण्यापूर्वीच करता येऊ शकते.
प्रौढ पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनचे जागतिक प्रमाण ३% ते ७६.५% पर्यंत असल्याचे दिसून आले आहे. सर्वात मोठ्या आणि अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षणांपैकी एकाने तपशीलवार प्रश्नावली वापरून सुमारे १२०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात असे आढळले की, वयाच्या ४० व्या वर्षी ३९% पुरुषांना नियमितपणे कोणत्या ना कोणत्या पातळीवरील नपुंसकत्वाचा अनुभव येतो. वयाच्या ७० व्या वर्षी हे प्रमाण ६७% पर्यंत वाढते. ज्यांना नपुंसकत्वचा दोष असलेल्या पुरुषांना हृदयरोग होण्याची शक्यता ५९% जास्त असते, आणि पक्षाघात (स्ट्रोक) होण्याची शक्यता ३४% जास्त असल्याचेही या सर्वेक्षणात आढळले.
पुरुषांच्या गुप्तांगात (लिंगात) स्पंजसारख्या दोन नळ्या असतात. जेव्हा एखादा पुरुष उत्तेजित होतो, तेव्हा त्याच्या मेंदूकडून गुप्तांगातील रक्तवाहिन्यांना एक संदेश मिळतो. हा संदेश मिळताच तिथले स्नायू सैल होतात आणि या दोन्ही नळ्यांमध्ये रक्ताचा प्रवाह वेगाने वाढू लागतो. रक्ताचा दाब वाढल्यामुळे या नळ्या फुगतात आणि बाहेर रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या दाबल्या जातात. यामुळे आलेले रक्त आतच अडकून राहते. रक्ताने भरल्यामुळे शरीराच्या या भागाला ताठरता येते. या नळ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात जर काहीही अडथळा आला, तर पुरुषांमध्ये ताठरता येण्यास किंवा ती टिकून राहण्यास अडचण निर्माण होते.
इरेक्टाइल डिस्फंक्शन अनेकदा शारीरिक नसून मानसिक कारणांमुळे असते. व्यक्ती मानसिक ताणाखाली असते तेव्हा शरीरात 'ॲड्रेनालाईन' आणि 'कॉर्टिसोल' नावाचे स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. यामुळे गुप्तांगातील रक्तवाहिन्या आकसतात आणि तिथल्या नळ्यांमध्ये पुरेसे रक्त पोहोचत नाही. परिणामी, ताठरता येण्यात अडचण निर्माण होते. सततच्या मानसिक ताणामुळे पुरुषांमधील मुख्य हार्मोन म्हणजेच 'टेस्टोस्टेरॉन'चे प्रमाणही कमी होते. यामुळे लैंगिक इच्छा मंदावते. याशिवाय, ताणामुळे मन विचलित होते आणि लैंगिक संबंधांवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन बसते.
शरीर धोक्यात किंवा ताणाखाली असते, तेव्हा ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ऊर्जा राखून ठेवते हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने शरीराची एक बचावात्मक पद्धत आहे. लैंगिक समस्यांचे तज्ज्ञ (सेक्सोलॉजिस्ट) इमॅन्युएल जनिनी यांच्या मते, "जर आजूबाजूचे वातावरण किंवा परिस्थिती सुरक्षित नसेल, तर प्रजनन करण्याऐवजी स्वतःचा बचाव करणे शरीराला जास्त महत्त्वाचे वाटते." त्यामुळेच मानसिक ताणाचा थेट परिणाम पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर होत असतो. परंतु, आधुनिक जगात, आपल्याला तणाव जाणवण्याची अनेक कारणे जीवघेणी नसतात, त्यामुळे ही संरक्षण यंत्रणा गरजेपेक्षा जास्त वेळा कार्यान्वित होऊ शकते.
इरेक्टाइल डिस्फंक्शन हे केवळ एक शारीरिक लक्षण नसून शरीरातील इतर मोठ्या आजारांचे संकेत असू शकते. आपल्या शरीरात गुप्तांगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आकाराने सर्वात लहान असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या आकसण्याचा किंवा ब्लॉक होण्याचा परिणाम सर्वात आधी या लहान वाहिन्यांवर होतो. म्हणूनच, ही समस्या हृदयविकाराची पहिली पूर्वसूचना मानली जाते. नुकत्याच झालेल्या एका मोठ्या संशोधनात सुमारे १,५४,७९४ लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताठरतेची समस्या असणार्या पुरुषांना हृदयविकार होण्याची शक्यता ५९% जास्त असते, तर पक्षाघात (ब्रेन स्ट्रोक) होण्याचा धोका ३४% जास्त असल्याचे स्पष्ट झाले.
शरीरातील रक्तवाहिन्या पूर्णपणे निरोगी असतील तर पुरुषांच्या गुप्तांगात चांगली ताठरता येते," असे युनायटेड किंगडममधील (UK) मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे प्रजनन शास्त्रज्ञ मायकल कॅरोल यांचे म्हणणे आहे. या विषयावर त्यांनी एक विशेष पुस्तकही लिहिले आहे. संशोधनातून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे, लैंगिक आरोग्य बिघडल्यास पुरुषांच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तैवानमध्ये झालेल्या एका वैद्यकीय अभ्यासात असे दिसून आले की, ज्या पुरुषांना इरेक्टाइल डिस्फंक्शन समस्या होती, त्यांना पुढील ७ वर्षांत 'स्मृतिभ्रंश' (मल्टिपल डिमेंशिया किंवा विसरभोळेपणा) होण्याचा धोका तब्बल ६८% जास्त होता. याचा अर्थ गुप्तांगाला योग्य प्रकारे काम करण्यासाठी चांगल्या रक्तप्रवाहाची गरज असते, अगदी तसेच आपल्या मेंदूलाही ऊर्जा मिळवण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी सतत चांगल्या रक्तपुरवठ्याची गरज असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये होणारा छोटासा बिघाडही पुढे जाऊन मेंदूच्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो, असेही संशोधनात स्पष्ट झाले आहे.
इरेक्टाइल डिस्फंक्शन (लिंगाच्या ताठरतेची समस्या) आणि मधुमेह यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, त्यांनी या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. रक्तातील वाढलेली साखरेची पातळी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेला गंभीर नुकसान पोहोचवते.रक्तातील साखर अनियंत्रितपणे वाढते, तेव्हा ती रक्तवाहिन्यांच्या भिंतींना जाऊन चिकटते. त्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन त्या कडक होतात, या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत 'ग्लायकेशन' म्हणतात. परिणामी, शरीराला ज्या भागात रक्ताची सर्वात जास्त गरज असते, तिथे होणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि गुप्तांगातील रक्तवाहिन्या अत्यंत नाजूक असल्यामुळे या वाढलेल्या साखरेचा सर्वात पहिला फटका तिथे बसतो. स्पेनमधील 'सँट पाऊ संशोधन संस्थे'चे संशोधक बोगदान व्लाचो यांच्या मते, मधुमेह नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत 'टाईप २ मधुमेह' असलेल्या पुरुषांना हा त्रास होण्याची शक्यता सुमारे तीन पटीने जास्त असते.
युनायटेड किंगडममधील (UK) 'द युरोलॉजी फाउंडेशन'ने केलेल्या एका सर्वेक्षणातून पुरुषांच्या मानसिकतेबाबत एक अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इरेक्टाइल डिस्फंक्शन असलेल्या निम्म्याहून अधिक पुरुषांनी केवळ लाज आणि भीतीपोटी डॉक्टरकडे जाणे टाळले. या सर्वेक्षणात २०% पुरुषांनी तर असेही सांगितले की, आपल्या या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्यापेक्षा ते महिनाभर बिअर न पिता राहणे पसंत करतील. पुरुषांमध्ये या विषयाबद्दल असलेली अनाठायी भीती यातून स्पष्ट होते. प्रजनन शास्त्रज्ञ मायकल कॅरोल यांच्या मते, पुरुषांची ही मानसिकता अतिशय धोकादायक आहे. ताठरतेची समस्या असलेल्या प्रत्येक पुरुषाने कोणतीही लाज न बाळगता डॉक्टरांची मदत घेतलीच पाहिजे. यामुळे केवळ मानसिक ताण आणि त्रासातून सुटका होत नाही, तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याविषयी डॉक्टरांशी एक महत्त्वाची चर्चा सुरू होते. ही चर्चा भविष्यातील अनेक गंभीर आजारांना वेळीच रोखून तुमचा जीव वाचवू शकते.
प्राण्यांच्या तुलनेत मानवी पुरुषांच्या शरीराची रचना या बाबतीत खूप वेगळी आणि गुंतागुंतीची आहे. आपले सर्वात जवळचे नातेवाईक मानल्या जाणाऱ्या चिंपांझी माकडांसह इतर अनेक प्राण्यांच्या गुप्तांगात 'बॅक्युलम' नावाचे एक हाड असते. लैंगिक उत्तेजनाच्या वेळी हे हाड बाहेर येते, यामुळे त्यांच्यात ताठरता टिकून राहते. त्यामुळे प्राण्यांचे लैंगिक जीवन त्यांच्या आरोग्यावर किंवा रक्तप्रवाहावर अवलंबून नसते. परंतु, मानवाने उत्क्रांतीच्या प्रवासात हे हाड गमावले आणि ताठरतेसाठी पूर्णपणे रक्ताच्या प्रवाहावर अवलंबून राहायला सुरुवात केली. यामुळेच पुरुषांमध्ये लैंगिक बिघाड आणि त्याविषयीची मानसिक असुरक्षितता वाढली. मानवाने हे महत्त्वाचे हाड का गमावले असावे? या प्रश्नाने अनेक शास्त्रज्ञांना कोड्यात पाडले आहे.
लैंगिक समस्यांचे तज्ज्ञ (सेक्सोलॉजिस्ट) इमॅन्युएल जनिनी यांच्या मते, यामागे एक रंजक कारण असू शकते. मानवी पुरुषांनी हे हाड गमावले जेणेकरून प्राचीन काळातील स्त्री पूर्वजांना योग्य आणि निरोगी जोडीदार निवडणे सोपे जावे. पुरुषाचे शरीर पूर्णपणे निरोगी असेल, त्याचाच रक्तप्रवाह चांगला राहील आणि त्याच्याकडूनच जन्माला येणारी मुले सशक्त होतील, हे ओळखण्याचा हा निसर्गाचा एक मार्ग होता. जनिनी म्हणतात, "प्रजननासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले हाड मानवाने गमावणे हे विचित्र वाटू शकते, कारण त्यामुळे पुरुषांची क्षमता खूप अनिश्चित बनते. पण यामुळेच, हे अवयव पुरुषांच्या शरीरातील लपलेल्या दीर्घकालीन आजारांना ओळखण्याचे एक उत्तम माध्यम (बायोमार्कर) बनले आहे."
सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे, इरेक्टाइल डिस्फंक्शन (लिंगाच्या ताठरतेची समस्या) हा काही बरा न होणारा आजार नाही. यावर 'व्हायग्रा' (सिल्डेनाफिल) सारखी औषधे अत्यंत प्रभावी ठरतात, जी गुप्तांगातील रक्तवाहिन्या रुंद करून तिथला रक्तप्रवाह सुधारतात. पण आता या औषधाबाबत काही अत्यंत रंजक आणि सकारात्मक माहिती समोर येत आहे. अनेक रुग्णांच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे कि, जे पुरुष आपले लैंगिक जीवन सुधारण्यासाठी ही गोळी घेतात, त्यांच्या हृदयाचे आरोग्यही सुधारते आणि 'हार्ट फेल्युअर' (हृदय निकामी होणे) चा धोका कमी होतो. (वैद्यकीय चाचण्यांमध्ये हे अद्याप पूर्णपणे सिद्ध झाले नसले, व्हायग्रा हे मूळचे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी आणि हृदयाच्या आजारांवरील उपचारासाठीच तयार केले गेले होते; पण नंतर त्याचा हा प्रसिद्ध झालेला 'दुष्परिणाम' समोर आला आणि ते लैंगिक समस्येसाठी वापरले जाऊ लागले.
इरेक्टाइल डिस्फंक्शन (लिंगाच्या ताठरतेची समस्या) यामागे केवळ शारीरिक आजारच असतात असे नाही, तर काहीवेळा 'पॉर्न' पाहण्याचे व्यसन किंवा लैंगिक इच्छेशी संबंधित मानसिक समस्या यांसारख्या गंभीर सवयीही कारणीभूत असू शकतात. प्रजनन शास्त्रज्ञ मायकल कॅरोल यांच्या मते, " एखाद्या पुरुषाला मधुमेह किंवा हृदयाचा आजार असेल, तर त्याचा या समस्येशी संबंध जोडणे आणि त्यावर उपचार करणे सोपे असते. मात्र, जर अतिमद्यपान, धूम्रपान यांसारख्या वाईट सवयींसोबतच मानसिक ताण आणि पॉर्न पाहण्याचे व्यसन एकत्र आले, तर यावर उपाय करणे खूप कठीण होते. कारण, अनेक पुरुष अशा सवयींबद्दल डॉक्टरांशी उघडपणे बोलण्यास तयार नसतात."त्यामुळेच आता इरेक्टाइल डिस्फंक्शन (लिंगाच्या ताठरतेची समस्या) योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले उपचार केवळ लैंगिक जीवनच नव्हे, तर तुमचे हृदय आणि मेंदू दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.