चीन बनवणार ‘ह्युमन्झी’ प्राणी? | पुढारी

चीन बनवणार ‘ह्युमन्झी’ प्राणी?

बीजिंग : नैतिकद‍ृष्ट्या योग्य नसणारे वैज्ञानिक प्रयोग करण्यात चिनी संशोधक पुढे आहेत आणि बदनामही आहेत. एकेकाळी चिनी संशोधकांनी मादी चिम्पांझीला मानवी वीर्याचा वापर करून गर्भवती बनवले होते. अद्यापही चिनी संशोधकांचे असे ‘ह्युमन्झी’ बनवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

दीर्घकाळापासूनच मानव आणि अन्य प्राण्यांमध्ये प्रयोगातून ‘हायब्रीड’ म्हणजेच ‘संकर’ बनवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा एक हेतू अवयव प्रत्यारोपण सर्वांसाठी सुलभ व कमी खर्चाचे व्हावे हा आहे. तसेच हायब्रीड ‘ह्युमन्झी’ चा वापर खाणकाम, कष्टाची कृषिकार्ये, अंतराळप्रवास तसेच समुद्रातील खोलवरील ठिकाणांचा शोध अशा कामांसाठी करणे हा एक उद्देश आहे. चीनमध्ये एका मादी चिम्पांझीला मानवी वीर्याने गर्भवती करण्यात आले होते.

1960 च्या दशकात देशातील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात हा वादग्रस्त प्रकल्प बंद करण्यात आला व त्यामुळे गर्भधारणा झाल्यानंतर तीन महिन्यांनी या मादी चिम्पांझीचा मृत्यू झाला. 1980 च्या दशकातील एक रिपोर्ट समोर आला होता. त्यामध्ये 1967 साली चीनमध्ये मानव-चिम्पांझी क्रॉस ब्रीडिंगचा जो प्रयोग झाला होता त्याची माहिती दिली होती.

असे म्हटले जाते की चिनी सरकारने हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास सांगितले होते. त्यामध्ये सहभागी वैज्ञानिकांपैकी एक असलेले डॉ. जी योंगजियांग यांनी सांगितले की बोलणारा आणि चिम्पांझीसारखी ताकद असणारा प्राणी निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. 2019 मध्ये यूएस साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे प्राध्यापक जुआन कार्लोस इजपिसुआ बेलमोंटे यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील वैज्ञानिकांनी याबाबत काही यशही मिळवले होते.

त्यांनी कथितपणे एक मानव आणि माकडाचे हायब्रीड विकसित केले होते व हा प्राणी 19 दिवस जिवंत राहिला होता. रशियामध्येही सोव्हिएत वैज्ञानिकांना 1920 च्या दशकात स्टॅलिनने हायब्रीड एपमॅन तयार करून असे ‘सुपर सोल्जर’ बनवण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. चीनमध्ये अद्यापही या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे म्हटले जाते.

Back to top button