राष्ट्रपतींच्या किल्ले रायगडावरील नियोजित भेटीप्रसंगी स्थानिक पत्रकारांना प्रवेश नाही! | पुढारी

राष्ट्रपतींच्या किल्ले रायगडावरील नियोजित भेटीप्रसंगी स्थानिक पत्रकारांना प्रवेश नाही!

महाड; पुढारी वृत्‍तसेवा

येत्या सोमवारी (6 डिसेंबर) रोजी राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाला स्थानिक वृत्तवाहिनी व पत्रकारांना प्रवेश मिळणार नसल्याची माहिती कार्यालय अलिबाग येथून देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सन एकोणीशे पंच्याऐंशी साली तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या रायगड भेटीनंतर सुमारे पस्तीस वर्षांनी देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडला भेट देणार आहेत.

स्थानिक नागरिकांसह शिवभक्त व पत्रकारांमध्ये समाधान व आनंदाची भावना निर्माण झाली होती, मात्र राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान अत्यावश्यक असलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव या भेटीमधून स्थानिक पत्रकार तसेच वृत्तवाहिन्यांना वगळण्यात आल्याची व प्रवेश मिळणार नसल्याची माहिती अलिबाग माहिती कार्यालयातून ठाकूर यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे.

या संदर्भात स्थानिक पत्रकारांच्या संघटनेकडून शासनाच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा प्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

माहिती कार्यालयाकडून राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात करण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर स्थानिक वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.

Back to top button