Lok Sabha Election 2024 : हायप्रोफाईल लढतींवर नजरा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हायप्रोफाईल लढतींवर नजरा

सुनील डोळे

पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता देशवासीयांचे लक्ष दुसर्‍या टप्प्यातील हायप्रोफाईल लढतींकडे लागले आहे. तीन केंद्रीय मंत्र्यांसह राजस्थानमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना या टप्प्यात अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात 8, केरळमध्ये सर्व 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, बिहारमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 3, पश्चिम बंगालमध्ये 3, तर जम्मू-काश्मीर आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होईल. केरळमधील तिरुअनंतपूरम येथे भाजपने केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना तिकीट दिले आहे. त्यांना काँग्रेसचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. दोन्ही नेते तगडे असल्यामुळे हा हायप्रोफाईल मुकाबला रंगतदार होण्याचे संकेत आहेत. भाकप म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथून पन्यन रवींद्रन यांना, तर बहुजन समाज पक्षाने अ‍ॅड. राजेंद्रन यांना मैदानात उतरविले आहे. मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला मिळणार, यावरच येथे विजयाचे गणित अवलंबून आहे.

केरळमधील अट्टिगंल मतदार संघातून भाजपने केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना मैदानात उतरविले आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अडूर प्रकाश यांना उमेदवारी दिली आहे. माकपने व्ही. जॉय यांना, तर बसपने अ‍ॅड. सुरभी एस. यांना संधी दिली आहे. बसपचा केरळमध्ये फारसा प्रभाव नसला, तरी या पक्षाच्या उमेदवारांना मिळणारी मते प्रमुख उमेदवारांच्या विजयाचे ठोकताळे बिघडवू शकतात.

संबंधित बातम्या

दुष्यंत सिंह विरुद्ध ऊर्मिला जैन

झालावाड-बारा हा राजस्थानातील लोकसभा मतदार संघ म्हणजे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 पासून तेथे त्यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह विजयी होत आले आहेत. त्यांना भाजपने चौथ्यांदा रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने त्यांच्या विरोधात ऊर्मिला जैन यांना, तर बसपने चंद्रसिंह किराड यांना उमेदवारी दिली आहे. किराड यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसला बसू शकतो. वसुंधरा राजे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात असल्यामुळे दुष्यंत सिंह यांना विजयी होण्यात अडचण येऊ नये, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

राजस्थानातील आणखी एक लक्षवेधी मतदार संघ म्हणजे जालोर. काँग्रेसने येथून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव यांना मैदानात उतरविले आहे. भाजपने त्यांच्या विरोधात लुंबाराम यांच्यावर विश्वास टाकला आहे. चिरंजीवाच्या विजयासाठी वडील अशोक गेहलोत यांनी सारा मतदार संघ पिंजून काढला आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना भाजपने राजस्थानातील जोधपूर मतदार संघातून तिकीट दिले आहे. ते विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने करण सिंह उचियारडा यांना मैदानात उतरविले आहे. बसपने मंजू मेघवाल यांना संधी दिली आहे. येथे सहा अपक्षांसह एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. येथेही बसपमुळे काँग्रेसच्या करण सिंह यांना फटका बसू शकतो.

ओम बिर्ला तिसर्‍यांदा मैदानात

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा मतदार संघातून तिसर्‍यांदा भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी येथे विजय मिळवला होता. यावेळी ते विजयाची हॅट्ट्रिक करणार काय, हे पाहावे लागेल. काँग्रेसने त्यांच्या विरोधात प्रल्हाद गुंजल यांना, तर बसपने धनराज यादव यांना तिकीट दिले आहे. येथे नऊ अपक्षांसह एकूण पंधरा उमेदवार मैदानात आहेत.

छत्तीसगडमधील राजनंदगाव मतदारसंघ हायप्रोफाईल मानला जातो. काँग्रेसने येथून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मैदानात उतरविले आहे. दुर्गचे रहिवासी असलेल्या बघेल यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यांना भाजपचेसंतोष पांडे आणि बसपचे देवलाल सिन्हा यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. येथे सात अपक्षांसह एकूण 15 जण रिंगणात आहेत. पांडे हेही शक्तिशाली उमेदवार असल्यामुळे बघेल यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही.

याखेरीज दुसर्‍या टप्प्यात केरळमधील वायनाडमधून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकातील मंड्यामधून माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, बंगळुरू दक्षिणमधून भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या, म्हैसूरमधून राजघराण्यातील यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगरमधून डॉ. महेश शर्मा, मथुरेतून हेमामालिनी, मेरठमधून अरुण गोविल, बिहारमधील पूर्णियातून बाहुबली नेता राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे अन्य उमेदवारही रिंगणात आहेत.

Back to top button