कोल्हापूर : टोळीयुद्धातून गोळीबार; इस्टेट एजंट गंभीर जखमी | पुढारी

कोल्हापूर : टोळीयुद्धातून गोळीबार; इस्टेट एजंट गंभीर जखमी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाचजणांनी गोळीबार करून डोक्यावर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात इस्टेट एजंट गंभीर जखमी झाला. जवाहरनगर परिसरात रविवारी रात्री 11 च्या सुमारास टोळीयुद्धातून हा खळबळजनक प्रकार घडला. दरम्यान, तरुणाच्या मांडीत गोळी घुसली असून डोक्याला मोठी जखम झाली आहे. साद शौकत मुजावर (वय 29, रा. सरनाईक वसाहत, यादव कॉलनी, जवाहरनगर परिसर, कोल्हापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

साद हा रविवारी जेवण करून रात्री उशिरा यादव कॉलनीतील चौकात दोन मित्रांसोबत नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसला होता. 11 च्या दरम्यान दोन दुचाकींवरून चार ते पाच हल्लेखोर चौकात आले. त्यातील एकाने पिस्टलमधून सादच्या दिशेने गोळ्या झाडल्या तर एका तरुणाने सादच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. सादच्या डाव्या पायाच्या मांडीत गोळी घुसली आणि डोक्यातूनही रक्तस्राव सुरू झाल्याने तो कोसळला. दरम्यान हल्लेखोर पळून गेले. मित्रांनी दुचाकीवरून साद याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
गोळीबाराची माहिती थोड्याच वेळात परिसरात समजताच मोठ्या संख्येने तरुण आणि सादचे कुटुंबीय तसेच नातेवाईक सीपीआरच्या आवारात जमले. हल्लेखोरांना तातडीने अटक करा, अशी मागणी या जमावाने केली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी जमावाला शांत केले.
दरम्यान, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तपास सुरू केला. साद हा जुनी वाहने आणि प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. हा हल्ल्याचा प्रकार आर्थिक देवघेवीतून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. हल्लेखोरांची नावे साद याने पोलिसांना सांगितल्याचेही समजते.

सादवर उशिरापर्यंत शस्त्रक्रिया

मांडीत खोलवर घुसलेली गोळी काढण्यासाठी साद याच्यावर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button