स्वाधारसाठी नवीन ‘व्हीपीडीए’ प्रणाली | पुढारी

स्वाधारसाठी नवीन ‘व्हीपीडीए’ प्रणाली

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेतून मिळणार्‍या लाभाची रक्कम कोषागार कार्यालयात व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाऊंटच्या (व्हीपीडीए) माध्यमातून थेट विद्यार्थ्यांना मिळणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असून याचा हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून इयत्ता दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या; परंतु ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन भत्ता दिला जातो.

कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी 700 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होतो. पूर्वी स्वाधारची रक्कम समाजकल्याण सहायक आयुक्त यांच्या खात्यावर जमा व्हायची. यात राज्य सरकारने बदल केला आहे. फेब्रवारी 2024 मध्ये वित्त विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय झाला आहे.

स्वाधार योजनातून लाभार्थी विद्यार्थ्यांना सुमारे 40 हजारांहून अधिक रक्कम दिली जाते. यात नव्या बदलानुसार आता व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाऊंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वाधारची रक्कम दिली जाणार आहे.

समाजकल्याण विभागाकडून कागदपत्रांची तपासणी करून ती कोषागार कार्यालयास पाठवली जातील. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी लिंक केलेले आधार कार्ड, पॅन कार्ड व एक चेक द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.

Back to top button