Lok Sabha elections 2024 : पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या प्रचाराकडे ठाकरे, पवारांची पाठ | पुढारी

Lok Sabha elections 2024 : पहिल्या टप्प्यातील काँग्रेसच्या प्रचाराकडे ठाकरे, पवारांची पाठ

मुंबई; गौरीशंकर घाळे : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठीचा प्रचार बुधवारी सायंकाळी थांबला. या ठिकाणी शुक्रवारी (दि. १९) मतदान होणार आहे. एकीकडे महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील नेते मैदानात उतरले; तर पाचही जागांवर काँग्रेसचे उमेदवार असल्याने महाविकास आघाडीच्या प्रचाराची सारी भिस्त काँग्रेसवरच राहिली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची इथे प्रचाराची एकही सभा झाली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचाराकडे ठाकरे-पवारांनी पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेतल्या; तर राज्यातील महायुतीचे नेतेही एकमेकांच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरले. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, इम्रान प्रतापगडी यांच्या प्रचारसभा झाल्या. मात्र, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार पहिल्या टप्प्यातील प्रचारापासून लांब राहिले. या दोन्ही नेत्यांची एकही सभा झाली नाही अथवा मेळावा पार पडला नाही. त्यामुळे, महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणुकांना सामोरे जात असल्याची संधी गमावली गेली. विशेषतः, सांगली आणि भिवंडीवरून सुरू झालेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर एकत्रित प्रचाराचा वेगळा संदेश देता आला असता. राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुक्रमे भंडारा-गोंदिया किंवा नागपुरातील सभेत ठाकरे-पवार असते, तर एकजुटीचा संदेश गेला असता. पुढील चार टप्प्यांतील प्रचाराची दिशाही यानिमित्ताने ठरली असती.

Back to top button