UPSC Kolhapur News: साळशीचे आशिष पाटील यांचा ‘यूपीएससी’त झेंडा: सलग तिसऱ्यांदा यशाला गवसणी | पुढारी

UPSC Kolhapur News: साळशीचे आशिष पाटील यांचा 'यूपीएससी'त झेंडा: सलग तिसऱ्यांदा यशाला गवसणी

चंद्रकांत मुदूगडे

सरूड : साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अशोक पाटील या ग्रामीण तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १४७ रँक मिळवून आयएएस पदाला गवसणी घातली. सलग तिसऱ्यांदा लखलखीत यश मिळवत साळशी गावासह शाहूवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याआधी मे २०२२ च्या निकालात ५६३ रँक प्राप्त करून आशिष उपजिल्हाधिकारी म्हणून (दिल्ली-दीवदमन) प्रशासकीय सेवेत दाखल झाले. तर गेल्या वर्षी ४६३ रँकने यश संपादन करून त्यांनी आयपीएस केडर निवडले होते. UPSC Kolhapur News

स्पर्धा परीक्षेतील ‘शाहूवाडी पॅटर्न’चा डंका

दरम्यान, आयएएसचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात एक वर्षाचे सेवेत एक्सटेन्शनचा पर्याय निवडून यूपीएससीची तयारी कायम ठेवली. अनुभव गाठीशी होताच. फक्त याआधीच्या लहानसहान चुका कटाक्षाने टाळणे आणि स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची इच्छाशक्ती ठेवली. साहजिकच पूर्व परीक्षा (जून २०२३) पाठोपाठ मुख्य परीक्षा (सप्टेंबर २०२३) आणि मुलाखत (१९ मार्च २०२४) असे प्रमुख टप्पे पादाक्रांत करून रँकमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यात त्यांना यश मिळाले. १४७ अशी रँक मिळाल्यामुळे थेट जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या यशाच्या चढत्या आलेखाने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेतील ‘शाहूवाडी पॅटर्न’चा डंका वाजला आहे. UPSC Kolhapur News

विशेषतः आशिष याने मराठी माध्यमातून तेही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला आहे. मात्र, इंग्रजी भाषेची निवड करून यूपीएससी परीक्षेला सामोरे जात त्याने एकदा नव्हे तर दोनदा यशाचा झेंडा फडकावला आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि गुरुजनांनी दाखविलेला मार्ग हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे निसंदिग्ध मत यशस्वी स्पर्धापरिक्षार्थी आशिष पाटील याने दै. पुढरीशी बोलताना व्यक्त केले आहे.

गलेलठ्ठ पगाराची नोकरीची संधी सोडून स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला

आशिष यांचे वडील अशोक बाळू पाटील हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक. कडवे केंद्रातील वीरवाडी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेता घेता आशिष यांनी चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावून आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखविली होती. सुपात्रे हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिक टप्प्यावर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही राज्याच्या यादीत अग्रक्रमाने झळकले. तर महात्मा गांधी विद्यालय, बांबवडे येथे दहावी शालांत परीक्षेत (सन २०१३) ९७ टक्के गुण प्राप्त केले. जिद्दी आशिष यांनी ‘एनटीएस’या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवून सातत्यपूर्ण यशाचा आलेख उंचावत ठेवला. यातून शिक्षण पूर्ण करेपर्यंत हक्काची शिष्यवृत्ती मिळाली. पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात १२ तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयातून विशेष श्रेणीतून पदवी (२०१९) मिळवली. भरभक्कम पगाराच्या नोकरीची चांगली संधी मिळूनही आशिषने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.

दरम्यान, स्वतःहून तयारी करण्याचे वेड भिनलेले आशिष यांना ‘अभ्यासाला बस’ असा सल्ला कधीही द्यावा लागला नसल्याचे त्याचे आईवडील आवर्जून सांगतात. प्रारंभीच्या काळात डोळ्यासमोरचे ध्येय गाठण्यासाठीची त्यांच्यातील भूक आणि परिश्रमाची तयारी पाहून पालकांनी यूपीएससी मार्गदर्शन वर्गासाठी दिल्ली येथे दाखल केले. येथे चार महिने सराव केला, आणि पुन्हा व्हाया पुणे आणि कोरोना काळात गावी येऊन स्वअध्ययनाचा मार्ग धरला. २०२० ची नागरी सेवा प्राथमिक परीक्षा पास झाले.

UPSC Kolhapur News : यशात मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा

मात्र, मुख्य परीक्षेत थोडक्यात अपयश आले. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत ५६३ रँक प्राप्त करून अपयश धुवून काढले. मात्र, मिळालेल्या यशाने हुरळून न जाता उलट येथेच मला थांबायचे नाही, अशी मनाशी खूणगाठ बांधली. त्यांनी यशाचे शिखर गाठण्याच्या इराद्याने पायरी मार्गावर उतरून नव्याने तयारी सुरू ठेवली. याचाच परिपाक म्हणून आशिष यांनी गेल्या वर्षी ४६३ वी रँक प्राप्त केली. तर त्यापुढे जाऊन मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी १४७ वी रँक पटकावली आहे. या त्यांच्या यशामध्ये गृहिणी असणारी आई, वडील अशोक पाटील (एम. ए. इंग्रजी), माध्यमिक शिक्षक ए.ए. पाटील तसेच प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे  आशिष यांने सांगितले.

‘यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, आणि समाधान हा शब्द यशात अडथळे निर्माण करतो. हे सुरुवातीपासून मनावर बिंबवले होते. त्यादृष्टीने ध्येय निश्चित केले आणि यूपीएससीची झपाटून तयारी केली. विशेषतः नागरी सेवा परीक्षेचे उपलब्ध साहित्य पाहता इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून पूर्वतयारीने परीक्षेला सामोरा गेलो. साहित्य वाचनाचा छंदही यशामध्ये कामी आला.’

आशिष पाटील (यशस्वी परीक्षार्थी, साळशी, ता. शाहूवाडी)

हेही वाचा 

Back to top button