मोदी सरकारला घटनाच मोडीत काढायची आहे : राहुल गांधी | पुढारी

मोदी सरकारला घटनाच मोडीत काढायची आहे : राहुल गांधी

तिरुनेलवेल्ली; वृत्तसंस्था : पेरियार यांची विचारधारा आणि संघ भाजपची विचारधारा या दोन विचारधारांची लढाई म्हणजे ही लोकसभा निवडणूक आहे. एक देश, एक नेता आणि एक भाषा हे सूत्र लादण्याचा संघ व भाजपचा डाव आहे. मोदी सरकारला त्यासाठी देशाची राज्यघटनाच मोडीत काढायची आहे, या आरोपाचा राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला.

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व संघावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, संघ आणि मोदी यांचा भाजप यांना एक देश, एक नेता आणि एक भाषा हे सूत्र या देशावर लादायचे आहे; पण तामिळ ही भाषा इतर कोणत्याही भारतीय भाषांपेक्षा कमी नाही. देशात अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कृती आहेत. त्या सर्व तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

राज्यघटनेच्या विषयावरून हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकारला या देशाची राज्यघटनाच बदलायची आहे. जग भारताला लोकशाहीचा आशेचा किरण म्हणून पाहात होते. तेच जग आता भारतात लोकशाही नाही असे म्हणायला लागले आहे. भाजपचे अनेक खासदार उघड उघड सत्तेत आल्यावर घटना बदलण्याच्या गर्जना करीत आहेत. हा या देशासमोरचा सर्वात मोठा धोका आहे.

30 लाख नोकर्‍या देणार

राहुल गांधी म्हणाले की, तरुणांच्या हाताला काम ही या देशातल सर्वात मोठी समस्या आहे. रोजगाराबाबत काँग्रेसने जाहीरनाम्यात गॅरंटी दिली आहे. त्यात अ‍ॅप्रेंटिसशिपचा हक्क आणि 30 लाख सरकारी नोकर्‍या हे वचन दिले आहे.

Back to top button