सायरनसारखा आवाज काढणार्‍या पक्ष्यामुळे ब्रिटिश पोलिस त्रस्त! | पुढारी

सायरनसारखा आवाज काढणार्‍या पक्ष्यामुळे ब्रिटिश पोलिस त्रस्त!

लंडन : कोकिळेची पंचम स्वरातील ‘कुहू कुहू’ असो किंवा अन्य पक्ष्यांचा गोड किलबिलाट असो, निसर्गाच्या सुंदर वातावरणाला हे आवाज नवे कोंदण देत असतात. मात्र, काही पक्ष्यांचा आवाज भलताच वेगळाही असतो. इंग्लंडमध्ये एका शहरातील पोलिस अधिकारी सध्या एका अशाच पक्ष्यामुळे त्रस्त झाले आहेत. हा पक्षी पोलिस गाड्यांच्या सायरनचा हुबेहूब आवाज काढतो!

हा पक्षी सायरनच्या आवाजाची इतकी बेमालूम नक्कल करतो की टेम्स व्हॅली पोलिसांना बर्‍याच वेळा गाड्यांमध्ये काहीतरी खराबी आली आहे की काय असे वाटते! बिसेस्टर पोलिस स्टेशनजवळ हा प्रकार घडत आहे. याठिकाणी रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांची टीम तैनात आहे. या टीमच्या प्रवक्त्याने सोशल मीडियात पोस्ट करून त्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना शंभर टक्के खरी आहे आणि तो एप्रिल फूलचा खोडसाळपणा नाही. ही पोस्ट आता बरीच चर्चेत आली आहे.

अनेक युजर्सनी गंमतीने विचारले की, हा पक्षी एखाद्या खास पोलिस दलाचा भाग तर नाही? पोलिसांनी म्हटले आहे की, हा पक्षी गाड्यांच्या सायरनची धून तपासणार्‍या वर्कशॉपजवळ किंवा रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांची गाडी थांबल्यावर प्रत्येक आवाज काळजीपूर्वक ऐकतो आणि नंतर त्याची हुबेहूब नक्कल करतो. त्यामुळे अर्थातच पोलिसांची फसगत होते व गोंधळ उडतो! यावर अनेक युजर्सनी गंमतीच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Back to top button