निरेच्या पाण्यात माशांची तडफड : प्रदूषणात मोठी वाढ | पुढारी

निरेच्या पाण्यात माशांची तडफड : प्रदूषणात मोठी वाढ

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : निरा नदीला प्रदूषणाचा विळखा पडला असून दुर्गंधीयुक्त आणि रासायनिक पाण्यामुळे बारामतीसह अन्य तालुक्यातील शेतीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. निंबूत ते सांगवीदरम्यान नदीपात्रातील संपूर्ण पाणी खराब झाले आहे. निंबूत, मुरूम, होळ, कोर्‍हाळे, लाटे, सांगवी या परिसरात असलेल्या बंधार्‍यात दुर्गंधीयुक्त पाणी आहे. निरा नदीचे पाणी दूषित झाल्याने नदीतील लाखो माशांचे जीव वाचविण्यासाठी तडफड सुरू आहे. दूषित पाण्याने माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जात असून, नदीलगत मासे मृतावस्थेत आढळून येत आहेत.

मुरूम व होळ येथे निरा नदीचे दृश्य पाहिले असता या ठिकाणी नदीतील पाण्याला रासायनिक काळा रंग आला आहे. होळ येथील बंधार्‍याच्या वरील बाजूस मुरुमाचा बंधारा आहे. तर होळ, कोर्‍हाळे खुर्द बाजूकडील पाणी अस्वच्छ व दूषित आहे. या भागाचा खालचा भाग म्हणजे कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, निरावागज येथेही हीच परिस्थिती आहे. दूषित पाण्याबाबत कायम फलटण तालुक्यातील कत्तलखाने, दूध कंपन्यांकडे बोट दाखविले जाते. परंतु, आता वरच्या भागातील होळ परिसरातील या स्थितीला नेमके कोणती कंपनी, कारखाने जबाबदार आहेत, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत. निरेतील दूषित पाण्यामुळे लाखो माशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे अस्वस्थता आहे. परंतु, याकडे कोणत्याही सरकारी यंत्रणेला लक्ष द्यायला वेळ नसल्याची स्थिती बारामती तालुक्यात पाहायला मिळते आहे.

येथे दूषित पाण्याने जे मासे तडफडत आहेत, त्यांचा जीव वाचणे सहजशक्य आहे. त्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. सरकारी पातळीवरून सूत्रे हलणे आवश्यक आहे. एकेकाळी पिण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी योग्य असलेले निरेचे पाणी प्रदूषणामुळे खराब होत असताना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या विषयावर कोणीही बोलण्यास तयार नाही. रासायनिक पाण्यामुळे निरा नदीतील माशांचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान निरेच्या प्रदूषणाबाबत सगळेच कारखाने, कंपन्या कानावर हात ठेवत असल्याने या प्रदूषणाला नेमके जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकर्‍यांना करावी लागणार भविष्यात वणवण

तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल तसेच सरकारी अधिकार्‍यांनीही निरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी या अगोदर केली होती. मात्र यानंतर कोणतीही उपायोजना न झाल्याने निरा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वेळेत प्रदूषण न थांबवल्यास सर्वसामान्य शेतकर्‍यांना शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात वणवण करावी लागणार हे निश्चित.

हेही वाचा

Back to top button