Lok Sabha Election 2024 : कोण होणार रायगडचा किल्लेदार?; फाटाफुटीमुळे निवडणुकीत रंगत | पुढारी

Lok Sabha Election 2024 : कोण होणार रायगडचा किल्लेदार?; फाटाफुटीमुळे निवडणुकीत रंगत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या रायगड लोकसभा मतदार संघात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदार संघात आतापर्यंत बहुतेकदा दुरंगी लढती झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याचा अंदाज बांधता येत होता. पण 2019 च्या निवडणुकीत जे सोबत होते, तेच मे 2024 ला होणार्‍या निवडणुकीत विरोधात आहेत. त्यामुळे ‘रायगड’ कोण सर करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. ( Lok Sabha Election 2024 )

शिवसेनेचे अनंत गीते आतापर्यंत सहावेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केवळ दोन हजार मतांनी त्यांना मात करता आली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तटकरे यांनी पराभवाची धूळ चारली. शेकापला सोबत घेत तटकरे यांनी या निवडणुकीत 31 हजार मतांनी विजय मिळवला. दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या गीते यांचा पराभव संभव नसल्याची चर्चा असताना दांडगा लोकसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर मते मिळवत तटकरे यांनी ही चर्चा वायफळ ठरवली.

भाजपासोबत युती असल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गीते यांना सहज विजय मिळत होता. आता यावेळच्या निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. गीते हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी त्यांच्यासोबत मूळ शिवसेना आणि आमदारही नाहीत. महत्वाचे म्हणजे भाजपाही नाही.भाजपा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तटकरे यांच्यासोबत आहे. इतकेच नाहीतर शिंदे सेनेचे आमदारही संगतीला आहेत. गत निवडणुकीवेळचा शेकाप आता शिवसेनेसोबत असला तरी भाजपा आणि शिवसेननेमुळे तटकरे यांचे पारडे जड झाले आहे.

सत्तेत असल्यानंतर विरोधकांशीही गोड बोलावे लागते. पण गीते यांना गोडवा जमला नाही. सर्वसामान्यांमध्ये मानाचे स्थान असलेल्या माजी मुख्यमंत्री अंतुले यांचा हिरवा साप अशा शब्दात गीते उल्लेख करत असत. तसेच त्यांनी नेहमीच कडवट हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे. यामुळे आजही त्यांच्यावर मुस्लिम समाजाची नाराजी आहे.

2019 मध्ये पराभव झाल्यानंतर गीते यांनी लोकांशी संपर्क तोडला होता. त्यामुळे कुणबी मतांवर भिस्त असलेल्या या समाजाचे मतदारही आता त्यांच्यावर नाराज आहेत. गीते या मतदारसंघात सहा वेळा विजयी झाले असले तरी प्रत्येक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी कमी होत गेली आहे. त्यामुळे 2019 मध्ये मोदी लाट असतानाही तटकरे विजयी झाले. तटकरे यांनी खासदार निधीच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. कन्या आदिती या मंत्री असून पुत्र अनिकेत आमदार आहेत. त्यांनीही जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. याउलट गीते यांची खासदारकीच्या कालावधीतील लक्षवेधी कामे दिसत नाहीत, असे मतदारांचे म्हणणे आहे.

तटकरेंचा दांडगा लोकसंपर्क आणि कामाचा ओघ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील फुटीचा त्यांच्या मतांवर परिणाम होणार नाही. रायगड जिल्हा परिषद, विविध पंचायत समित्यांमध्ये तटकरे यांचा प्रभाव आहे. शिवाय कन्या अदिती यांच्यासह महायुतीमधील आमदार रवीशेठ पाटील, भरत गोगावले, महेंद्र दळवी, योगेश कदम हे तटकरे यांच्या विजयासाठी मैदानात उतरले आहेत.

भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असले तरी तटकरे त्यांचे जुने सहकारी आहेत. त्यांचीही अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते, अशी चर्चा आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा अर्थात महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे रायगड मतदार संघात बाजी कोण मारणार हे चित्र आताच स्पष्ट झाले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही गीते हे शरद पवार यांच्यावर टीका करत होते. पवार हे आमचे नेते नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे नेते आहेत. तसेच राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, अशी विधाने करून एकप्रकारे राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेचे नुकसान होत आहे, असे सांगण्याचा गीते प्रयत्न करत होते. ( Lok Sabha Election 2024 )

आता तेच शरद पवार गीते यांना मनापासून या निवडणुकीत मदत करतील का, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या बड्या पक्षांमध्ये पडलेले गट, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमधील विभाजन आणि मतदारांमध्येही फूट पडली आहे. आता केवळ उमेदवारांच्या प्रभावावरच मते मिळणार आहेत. या मतदारसंघात राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

Back to top button