आंधळं प्रेम! अन् ‘ती’ प्रियकरासह झाली रफूचक्कर | पुढारी

आंधळं प्रेम! अन् 'ती' प्रियकरासह झाली रफूचक्कर

दीपक जाधव, पणजी

कर्नाटकातील लोंढा येथील वैभवीचे आपल्याच गावातील सूरज मायगेरी याच्याशी शालेय वयापासून प्रेमसंबंध होतेे; पण वैभवीच्या घरच्यांना त्यांचे हे आंतरजातीय प्रेम अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे वैभवीच्या पालकांनी तिचे लग्न गावातील आणि नात्यातीलच विश्वनाथ याच्याशी लावून दिले. लग्नानंतर विश्वनाथ हा रोजगाराच्या निमित्ताने दक्षिण गोवा जिल्ह्यातील पेडा बाणावली या गावी स्थायिक झाला. अल्पावधीत या दाम्पत्याला एक मुलगाही झाला. इकडे सूरजचेही लग्न होऊन त्याचाही संसार सुरळीत लागला. दोघांचाही आपापला संसार सुखाने सुरू असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास पाच-सहा वर्षांनंतर वैभवी आणि सूरज हे पुन्हा एकदा परस्परांच्या संपर्कात आले आणि त्यांची अधुरी प्रेमकहाणी पुन्हा सुरू झाली.

वैभवी सूरजला भेटण्यासाठी वारंवार आपल्या माहेरी व अन्य ठिकाणी जावू लागली. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तासन् तास गप्पा मारू लागली. यातून दोघांनीही पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या आणाभाका घेतल्या. बालपणातील अल्लड प्रेमाच्या नादात दोघांनीही आपापले भरले-नांदते संसार मोडायची जणू काही सिद्धताच केली होती. पण, दोघांनाही अडसर वाटत होता तो विश्वनाथचा, त्यामुळे दोघांनी मिळून विश्वनाथचा काटा काढायचा निर्णय घेतला. जवळपास सहा महिने त्यांचा हा बेत शिजत होता.

विश्वनाथचा खून!

एकेदिवशी सूरज हा वैभवीचा नातेवाईक बनून विश्वनाथच्या घरी मुक्कामाला आला. विश्वनाथला दारूचे व्यसन आहे, हे वैभवीने सूरजला आधीच सांगून ठेवले होते. त्यानुसार रात्री सूरजने आग्रह करून विश्वनाथला भरपूर दारू पाजली. दारूच्या नशेत विश्वनाथ झोपून जाताच वैभवी आणि सूरजच्या मनातील सैतान जागा झाला. सूरजने एक जाडजूड लोखंडी जग पुर्‍या ताकदीने विश्वनाथच्या डोक्यात घालताच त्याची कवटी फुटून तो जागीच ठार झाला. तो ठार झाल्याची खात्री पटताच त्याच पहाटे सूरज हा वैभवी आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा यांच्यासह विश्वनाथच्याच मोटारसायकलवरून कर्नाटकात पसार झाला.

भल्या सकाळी पेडा बाणावली या शांतताप्रिय गावातील विश्वनाथच्या खोलीत त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी विश्वनाथच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची पत्नी आणि मुलगी सापडली नाही. कारण वैभवी ही त्याच पहाटे आपल्या प्रियकरासह रफूचक्कर झाली होती. त्यामुळे पोलिसांनी कर्नाटकातील नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानुसार विश्वनाथचे वडील शंकर सिधनाल बाणावलीत दाखल झाले. त्यांनी विश्वनाथचा खून केल्याची तक्रार दाखल केली. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने पुरावे गोळा केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यातून काही माहिती हाती आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विश्वनाथची पत्नी व मुलगा एका इसमासोबत विश्वनाथची दुचाकी घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे विश्वनाथच्या पत्नीवर पोलिसांचा संशय बळावला. मात्र, तिचा फोन बंद येत असल्याने तिचा ठावठिकाणा सापडत नव्हता. खुनाला चोवीस तास उलटल्यानंतर विश्वनाथची पत्नी वैभवी ऊर्फ मंगल ही पुन्हा बाणावलीत कोणाला तरी भेटण्यासाठी आली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पत्नीकडून खुनाची कबुली

वैभवी हिने सुरुवातीला पोलिसांच्या प्रश्नाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या मिळताच वैभवीने खुनाची कबुली दिली. वैभवीकडून खुनाची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर सूरज मायगेरी याच्याविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच सूरजने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने सूरजला कर्नाटकातून अटक केली. त्याची रवानगीही कोठडीत करण्यात आली आहे. बालवयातील प्रेम म्हणजे काही खरंखुरं प्रेम नसतं, तर ते असतं केवळ परस्परांविषयीचं शारीरिक आकर्षण! पण या असल्या प्रेमालाच आपलं खरं प्रेम समजणार्‍या सूरज आणि वैभवीने या प्रेमापायी आपापले भरले संसार लाथाडले. पण, नियतीनं एका फटक्यात त्यांचं उभं आयुष्यच लाथाडून टाकलं.

Back to top button