Loksabha Election 2024 : दिव्यांगाच्या मतासाठी यंत्रणा तेलंगणा सीमेवरील दुर्गम गावात | पुढारी

Loksabha Election 2024 : दिव्यांगाच्या मतासाठी यंत्रणा तेलंगणा सीमेवरील दुर्गम गावात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुक्यातील दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर महाराजगुडा गाव आहे. या गावात एकूण मतदार 281 आहेत. यामध्ये एक दिव्यांग मतदार आहेत. या दिव्यांग एका व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचली आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत गुप्त मतदान पद्धतीने नोंदविले. हीच भारतीय लोकशाहीची खरी ताकद असल्याचे यावेळी अनुभवास आले. (Loksabha Election 2024)

भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. शुभारंभ अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला. सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात घरातून नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. (Loksabha Election 2024)

यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. यावेळी मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button