माजी खासदाराच्या पक्षांतराने जळगावात रंगत | पुढारी

माजी खासदाराच्या पक्षांतराने जळगावात रंगत

मिलिंद सजगुरे

भाजपने लोकसभा तिकीट नाकारलेले जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून ठाकरेंनी सत्ताधार्‍यांना जोरदार धक्का दिला आहे. पाटील यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाच्या जळगावस्थित उमेदवारीचा प्रश्नही निकाली निघाला असून, त्यांचे खंदे समर्थक करण पवार यांना प्रवेश करताक्षणीच मैदानात उतरवण्याची घोषणा करण्यात आली. पाटील यांच्या प्रवेशाने जळगावमधील लढत रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेल्या उमेदवार यादीमध्ये दोन विद्यमान खासदारांच्या नावांना कात्री लावण्यात आली. त्यामध्ये उत्तर मुंबई मतदार संघातील गोपाळ शेट्टी आणि जळगावच्या उन्मेष पाटील यांचा समावेश होता. पैकी शेट्टी यांनी पक्षनिष्ठा म्हणून निर्णय मान्य केला. पाटील मात्र नाराज असल्याचे त्यांच्या पक्ष बैठकांपासून दूर राहण्यातून अधोरेखित झाले होते. तेव्हापासूनची शांतता वादळापूर्वीची असल्याचे बुधवारच्या त्यांच्या ठाकरेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशातून सिद्ध झाले. पाटील यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक तथा पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार आणि शेकडो कार्यकर्ते भाजप त्यागून ठाकरेंच्या पक्षात प्रवेशकर्ते झाले. पक्षप्रवेश सोहळ्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चार उमेदवारांची नावे जाहीर करताना जळगावमधून करण पवार यांची उमेदवारी घोषित केली. पवार यांना महायुतीकडून भाजपने मैदानात उतरवलेल्या स्मिता वाघ यांचा मुकाबला करावा लागणार आहे. पाटील-पवार द्वयींच्या पक्षप्रवेशातून जळगावची निवडणूक एकतर्फी होणार म्हणून आत्मविश्वास दाखवणार्‍या भाजप नेत्यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचे मानण्यात येत आहे. एकूणच पाटील-पवारांच्या नव्या राजकीय इनिंगमुळे जळगावमध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यता गडद झाली आहे.

व्यवसायाने अभियंता असलेल्या उन्मेष पाटील यांना भाजपने प्रथम चाळीसगावमधून आमदारकीचा मुकुट चढवून नंतर 2019 मध्ये जळगाव मतदार संघातून खासदारकीसाठी तिकीट दिले. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या जळगाव मतदार संघातून पाटील हे 4.11 लाखांचे मताधिक्य घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला. ग्रामीण भागात भाजपने मिळवलेला हा महत्तम विजय होता. पाटील यांना तब्बल 65 टक्के मतांचे वाण पदरात पडले. तथापि, खान्देश भाजपची एकहाती कमान सांभाळणार्‍या गिरीश महाजन यांच्यासोबत पाटलांचे बिनसले. शिवाय, चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्याशीही पाटील यांनी पंगा घेतला. त्याचीच परिणती पाटलांचा पत्ता कट करण्यात झाली.

निष्ठा वाहणार्‍या करण पवार यांना राजकीय वारसा आहे. पवार यांचे आजोबा भास्करराव पवार-पाटील हे दोन दशके आमदार होते. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदावर राहिलेल्या डॉ. सतीश पवार पाटलांचे करण हे पुतणे आहेत. आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केलेल्या पवारांनी 2009 मध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली. 2014 च्या सुमारास भाजपचे कमळ हाती धरून ते पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. अलीकडेही त्यांच्याकडे नगराध्यक्षपद होते. उन्मेष पाटील यांचे कडवे समर्थक म्हणून ते परिचित आहेत.

Back to top button