बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी पडता-पडता जिंकली | पुढारी

बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी पडता-पडता जिंकली

हरीष पाटणे

सातारा  : राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यावर ठेवलेली कमांड 2004 च्या निवडणुकीतही कायम राहिली. सातारा व कराड या दोन्ही मतदार संघात पुन्हा एकदा झेंडा फडकावत राष्ट्रवादीने विरोधकांना धोबीपछाड दिले खरे. पण राष्ट्रवादी सातारा लोकसभा मतदार संघात अक्षरश: पडता पडता जिंकली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित येत लढवलेल्या या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीनेही टक्कर दिली. विशेषत: सातारा लोकसभा मतदार संघात लक्ष्मणराव पाटील यांनी शिवसेनेच्या हिंदूराव ना. निंबाळकरांचा अवघ्या 3957 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष चिमणराव कदम यांनी घेतलेली 62492 मते हिंदुरावांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे घटलेले मतदान व शिवसेनेचे वाढलेले सुमारे लाखभर मतदान बालेकिल्ला म्हणून मिरवणार्‍यांना धडा देवून गेले. कराड मतदार संघात मात्र श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा सुमारे दोन लाख मतांनी दणदणीत विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसने 1999मध्ये झालेल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात करिष्मा करून दाखवला होता. स्थापनेनंतर झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार व 9 आमदार निवडून आले होते. त्यामुळे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा वरचष्मा निर्माण झाला होता. 2004 च्या 14 व्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले. मात्र, सातारा लोकसभा मतदार संघातील निकाल त्यांना शहाणपण देवून गेला. या निवडणुकीत फलटणची मुलुखमैदान तोफ अशी राज्यभर ख्याती असलेल्या चिमणराव कदम यांनी रंगत आणण्याचा प्रयत्न  केला. मात्र, यामध्ये त्यांना यश आले नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला सातारा मतदारसंघात निसटता विजय मिळाला. शिवसेनेच्या हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी त्यांना विजयासाठी नाकीनऊ आणले. लक्ष्मणराव पाटील यांच्या रागीट स्वभावाविषयीची नाराजी मतातून बाहेर पडली. लक्ष्मणराव पाटील यांना 2 लाख 81 हजार 577 तर हिंदूराव नाईक निंबाळकर यांना 2 लाख 77 हजार 620 मते मिळाली. पाटील यांचा निसटता विजय झाला. सातारा विधानसभा मतदारसंघाने त्यांना साथ दिली नसती तर तात्या दुसर्‍यांदा खासदार होवू शकले नसते. अपक्ष चिमणराव कदम यांनी निवडणूक प्रचारावेळी आपल्या भाषणांनी सभा गाजवल्या होत्या. मात्र, त्यांना 62492 मतापर्यंतच मजल मारता आली.
कराड मतदार संघात 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील व शिवसेनेचे वसंतराव मानकुमरे यांच्यात मुख्य लढत झाली. त्याशिवाय बहुजन समाज पार्टीचे अ‍ॅड. प्रभाकर कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळकृष्ण जाधव, अपक्ष आनंदराव थोरात हेही निवडणूक रिंगणात होते. वसंतराव मानकुमरे यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला होता. काँग्रेसच्या नाराज मतावर त्यांनी विजयाची गणितेही मांडली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना विजयाने हुलकावणी दिली तरीही त्यांना मिळालेली मते दुर्लक्षित करता येणारी नव्हती. श्रीनिवास पाटील यांना 4 लाख 36 हजार 732 तर मानकुमरे यांना 2 लाख 40 हजार 2 मते मिळाली होती. अन्य 3 उमेदवार अदखलपात्र ठरले होते. सातारा व कराड या दोन्ही लोकसभा मतदार संघाने घड्याळ्याचा गजर कायम ठेवत सातारा जिल्हा 2004 सालीही शरद पवारांचाच बालेकिल्ला ठेवला.

2004 ला विधानसभेला  काय घडले?

2004 साली झालेली विधान सभेची निवडणूकही मोठी रंगतदार झाली. फलटण विधानसभा मतदार संघातून रामराजे नाईक निंबाळकर, कोरेगाव विधानसभा मतदार संघातून शालिनीताई पाटील, कराड उत्तर मतदार संघातून बाळासाहेब पाटील, माणमधून संपतराव अवघडे, सातारा मतदार संघातून शिवेंद्रराजे भोसले, जावली मतदार संघातून शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेत गेले. खटावमधून भाजपचे डॉ. दिलीप येळगावकर, वाईतून अपक्ष मदनदादा भोसले, पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई, कराड दक्षिणेतून काँग्रेसचे विलासराव पाटील उंडाळकर हे विधानसभेत गेले.

जेव्हा तालिम संघावर शरद पवार  स्व. अभयसिंहराजेंचे नाव घ्यायला विसरतात

फेब्रुवारी 2004 मध्ये सातार्‍यात अकल्पीत घटना घडली होती. सातार्‍याचे नेते अभयसिंहराजे भोसले यांचे आकस्मिक निधन झाले होते. त्या निधनामुळे अचानकपणे अभयसिंहराजेंच्या गटाची जबाबदारी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर आली होती. राजकारणात नवखे असले तरी मुत्सद्दीपणाचा गुण शिवेंद्रराजेंमध्ये ठायीठायी भरला आहे तो तेंव्हापासूनच. त्यांनी शरद पवारांचा विचार माणून राजकारणात काम करण्यास सुरुवात केली होती. लोकसभेच्या 2004 च्या निवडणुकीत तालिमसंघाच्या मैदानावर लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे नियोजन बरेचसे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे होते. प्रत्यक्षात सभेवेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात कुठेच अभयसिंहराजेंचा उल्लेख केला नाही. शिवेंद्रराजेंचे समर्थक त्यामुळे कमालीचे संतापले. त्यांनी पवारांच्या सभेनंतर प्रचारच बंद केला.
निवडणूक दोन दिवसांवर आली असतानाच सातार्‍यातील हा दणका तात्यांना परवडणारा नव्हता. अनावधानाने का होईना झालेली चूक पवारांची होती. पण फटका तात्यांना बसणार होता. जाहीर प्रचार तर बंद झाला होता. शिवेंद्रराजेही नाराज झाले होते. शेवटी निवडणुकीच्या आदल्या दिवशी अजितदादा व जयंत पाटील नागठाणेत शिवेंद्रराजेंना भेटले ते एकत्र सुरुचीवर आले. तात्यांनीही शिवेंद्रराजेंचे मित्र असलेले आपले भात्यातले बाण शिवेंद्रराजेंकडे पाठवले. त्यांची व कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली. जाहीर प्रचार संपल्याने फक्त वृत्तपत्राद्वारे बातमी छापता येणार होती. निवडणुकी दिवशी दै. पुढारीत बातमी होती.‘स्व. अभयसिंहराजेंचे उरमोडीचे स्वप्न पूर्णत्वाला नेणार : खा. लक्ष्मणराव पाटील’. कार्यकर्त्यांचा राग एका बातमीने संपवला.  शिवेंद्रराजेंनीही तो प्रसंग विसरुन प्रामाणिकपणे लक्ष्मणराव पाटील यांना मदत केली. या मदतीमुळेच तात्या दुसर्‍यावेळी खासदार झाले. इतिहास विसरायचा नसतो. त्यावेळचे मतदान काढून पहा. सातारा विधानसभा मतदार संघाचे मताधिक्यच तात्यांच्या कामी आले. शिवेंद्रराजे व त्यांच्या  मित्रांच्या या योगदानाची नोंद लक्ष्मणराव पाटील यांनी कायम स्वरुपी ठेवली.

Back to top button