राज्यात भाजप 21 हजार नमो संवाद सभा घेणार | पुढारी

राज्यात भाजप 21 हजार नमो संवाद सभा घेणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रात स्टार प्रचारकांच्या सभांबरोबरच पक्ष संघटनेच्या शक्ती केंद्र पातळीवरील 21 हजार नमो संवाद सभांच्या आयोजनाची तयारी चालविली आहे. या 21 हजार नमो संवाद सभांच्या माध्यमातून एक कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी बुधवारी दिली.

पत्रकार परिषदेत विक्रांत पाटील यांनी या सभांबाबत माहिती दिली. नमो संवाद सभांच्या माध्यमातून 2014 पूर्वीचा भारत आणि आता मोदी सरकारच्या काळात घडलेल्या नवभारताचे तुलनात्मक चित्र सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होतील. 21 हजार शक्ती केंद्रांवर होणार्‍या या सभांमध्ये 300 पेक्षा अधिक वक्ते सहभागी होणार आहेत. दररोज 7 ते 8 सभा होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. ते म्हणाले की, फेरीवाले, व्यापारी, शिक्षक अशा विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागामध्ये ‘नमो चौपाल,’ तर युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी ‘कॉफी विथ यूथ’ असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Back to top button