मायग्रेनच्या त्रासासाठी केली तपासणी; मेंदूत आढळला जंत! | पुढारी

मायग्रेनच्या त्रासासाठी केली तपासणी; मेंदूत आढळला जंत!

वॉशिंग्टन : अमेरिकेत काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती डॉक्टरांकडे आली होती. मला सतत मायग्रेनचा त्रास होतोय, असे त्यांनी सांगितले. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या मेंदूत चक्क जंत म्हणजेच पट्टकृमी आढळले. लांबलचक जंत एका रिबिनसारखे गुंडाळलेल्या अवस्थेत होते. कमी शिजवलेले डुकराचे मांस खाण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. पण याविषयी आणखी संशोधन करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

अमेरिकेतील 52 वर्षीय पीडितेला मायग्रेनचा त्रास असह्य झाला होता. औषधांनीही काम होत नसल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा ही बाब समोर आली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी स्कॅन केले आणि त्यांच्या मेंदूमध्ये जंत आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या जंतांमुळे पीडितेला सिस्टोसेरकोसिस आजार झाला होता. हात नीट न धुणे आणि कमी शिजवलेले डुकराचे मांस खाल्ल्याने हा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे.

सिस्टोसेरकोसिस हा एक प्रकारचा संसर्ग आहे जो परजीवी ‘टी सोलियम’च्या अळ्यांमुळे होतो. त्यांना डुकराचे ‘टेपवर्म’ असेही म्हणतात. या घटनेनंतर मेंदूमध्ये सिस्टस् म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात. टेपवर्मच्या संपर्कात आलेली एखादी व्यक्ती टेपवर्म अंड्यांद्वारे संक्रमण करू शकते – या प्रक्रियेला ऑटोइन्फेक्शन असे म्हटले जाते. यामध्ये माणसाच्या मलविसर्जनामुळे घरात इतरांना संक्रमण होऊ शकते.

पण, काही तज्ज्ञांच्या मते मात्र कमी शिजवलेले डुकराचे मांस खाल्ल्याने थेट ‘सिस्टोसेर्कोसिस’ होत नाही. सध्या केवळ तसा अंदाज बांधला जात आहे. पण हात नीट न धुण्यामुळे रुग्णाला सिस्टोसेरकोसिसचा संसर्ग झाल्याचे अमेरिकन जर्नल ऑफ केस रिपोर्टस्मध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील रुग्ण आता औषधांना प्रतिसाद देत आहे आणि बरा होत आहे.

Back to top button