पुढे कचरा उचलला, मागे ढीग लावा..! केशवनगरच्या रस्त्यावरील चित्र | पुढारी

पुढे कचरा उचलला, मागे ढीग लावा..! केशवनगरच्या रस्त्यावरील चित्र

शिवाजी शिंदे

पुणे : महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी कचरा उचलल्यानंतर नागरिक पुन्हा त्याच ठिकाणी कचरा टाकत असल्याने केशवनगरमधील विविध रस्त्यांवर दिवसभर कचर्‍याचे ढीग पडलेले दिसतात. या कचर्‍यावर भटकी कुत्री व जनावरे वावरत असल्याने कचरा अस्ताव्यस्त होऊन दुर्गंधी पसरते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

केशवनगर भागात कचरा उचलण्याचे महापालिकेने स्वच्छ या संस्थेला काम दिले आहे. या संस्थेने नेमलेले कर्मचारी नित्यनेमाने नागरिकांच्या घरासमोर जाऊन कचरा उचलत असतात. मात्र, बहुतांश नागरिक कचरा उलचणार्‍या कर्मचार्‍यांकडे कचरा देत नाहीत. या प्रकारातील नागरिक रात्री किंवा पहाटेच्या वेळी रस्त्यावर किंवा नदीपात्राच्या कडेला कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे केशवनगरमधील संभाजी चौकाजवळील पूल, पीएमपी बसस्थानक, रेणुकामाता मंदिर, लोणकर वस्तीसह आसपासच्या भागांत अनेक महिन्यांपासून नागरिक बिनधास्तपणे कचरा टाकत आहेत.

या कचर्‍यामधून खूप मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. मात्र, नागरिकांना त्याची फिकीर नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक या भागात फेकण्यात आलेला कचरा दररोज उचलण्यात येतो. मात्र, नागरिक पुन्हा त्याच जागेवर कचरा टाकत आहेत. कचरा फेकणार्‍यांच्या विरोधात महापालिका दंड ठोठावते. मात्र, दंड ठोठावणारी यंत्रणा ठप्प झाल्यामुळेच वारंवार कचरा टाकण्याचे धाडस नागरिक करत आहेत.

महापालिकेच्या वतीने कचरा गोळा करण्यासाठी गाड्या येतात. मात्र, या लोकांना महिन्याला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे अनेकजण पैसे न देता ते गेल्यानंतर कचरा रस्त्यावर आणि आडोशाला टाकून देतात. तसेच, अनेकजण दुचाकीवरून जाताना कचरा फेकतात. त्यामुळे कचर्‍याचे ढीग साचलेले दिसतात. यावर उपाय म्हणून महापालिकेने काहीतरी यंत्रणा निर्माण करावी.

– अनिल माळी, नागरिक

हेही वाचा

 

Back to top button