Pune : पीटी-3 फॉर्म भरलेल्यांना दिलासा ! | पुढारी

Pune : पीटी-3 फॉर्म भरलेल्यांना दिलासा !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील ज्या मिळकतधारकांनी मिळकतकरात 40 टक्के सवलत मिळण्यासाठी महापालिकेकडे पीटी-3 फॉर्म जमा केला आहे, अशांना मिळकतधारकांना 2024-25 च्या करामध्ये सवलत मिळणार आहे. महापालिकेतर्फे पुणेकरांना त्यांच्या निवासी मिळकतीसाठी 1970 पासून जे लोक स्वतः घरात राहतात, त्या मिळकतीच्या सर्वसाधारण करात 40 टक्के सवलत दिली जात होती. ज्या मिळकतीमध्ये भाडेकरू ठेवण्यात आले आहेत, अशा मिळकतींना सवलत दिली जात नाही. मात्र, 2018 पासून ही सवलत रद्द करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने 2019 पासून नवीन करआकारणी केलेल्या मिळकतींची 40 टक्के सवलत काढून घेतली.

तसेच, जीआयएस मॅपिंग सर्व्हेमध्ये भाडेत्त्वावर देण्यात आल्याचे आढळलेल्या मिळकतींचीही ही सवलत काढून घेतली. मात्र, नागरिकांनी जोरदार विरोध केल्यानंतर राज्य सरकारने ही सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2019 पासून 40 टक्के सवलत रद्द झालेल्या मिळकतधारकांनी पीटी-3 फॉर्म भरून द्यायचा आहे. या फॉर्मसोबत मिळकतधारकांना सोसायटीचा ना हरकत दाखला, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, गॅस कार्ड, रेशन कार्ड अशी कागदपत्रे द्यावी लागतात.

सवलतीसाठी महापालिकेकडे तीन लाख पीटी-3 फॉर्म येणे अपेक्षित असताना महापालिकेकडे आत्तापर्यंत 90 हजार फॉर्म जमा झाले आहेत. उर्वरित मिळकतधारकांना यापुढेही पीटी-3 फॉर्म भरता येणार आहेत. मात्र, त्यांना 2024-25 या वर्षात सवलत लागू होणार नाही. मात्र, फॉर्म भरलेल्या 90 हजार मिळकतींना 2024-25 या वर्षात करामध्ये सवलत मिळणार आहे, असे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

त्रुटी आढळल्यास तपासणी होणार

पीटी-3 फॉर्मसोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले होते. मात्र, अपुर्‍या मनुष्यबळामुळे प्रत्येक मिळकतीला भेट देणे व स्वतः मालकच राहतो का, याची शहानिशा करणे शक्य नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या सर्व मिळकतींना सवलत दिली जाणार आहे. ज्यांच्या कागदपत्रांमध्ये गडबड व त्रुटी आढळतील त्यात मिळकतींना भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. या पाहणीत भाडेकरू राहत असल्याचे आढळल्यास दिलेली 40 टक्के सवलत तत्काळ रद्द करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button