Lok Sabha Election 2024 : ईशान्य भारतात भाजपकडून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : ईशान्य भारतात भाजपकडून विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी

अरविंद राय

दर्जेदार रस्ते, पर्यटनाला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचे जाळे या माध्यमातून मोदी सरकारने ईशान्य भारताला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. याच विकास कामांच्या जोरावर भाजपला मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. जनतेच्या मनात काय लपले आहे, याचे उत्तर निकाल जाहीर झाल्यानंतरच मिळेल.

आगामी लोकसभा निवडणुकांत ईशान्य भारतात भाजपचा जोर विकास कामांवर असेल, याचे संकेत मिळू लागले आहेत. या भागातील सर्वात मोठे राज्य म्हणजे आसाम. या राज्यात लोकसभेच्या एकूण 14 जागा असून, तेथे चार टप्प्यांत मतदान होणार आहे. भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या राष्ट्रीय पक्षांसह काही प्रादेशिक पक्षही यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अर्थात, खरी लढत आहे ती एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात. एनडीएमध्ये झालेल्या समाझोत्यानुसार भाजप अकरा जागांवर, तर अन्य छोटे पक्ष उर्वरित तीन जागा लढविणार आहेत. विरोधी आघाडीबद्दल बोलायचे तर काँग्रेसने तेरा जागा लढविण्याचे ठरवले आहे. एक जागा त्यांनी आसाम गण परिषदेला सोडली आहे. 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने नऊ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला तेव्हा तीन, तर एआययूडीएफ आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता. यावेळी भाजपने केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना आपला निवडणुकीतील चेहरा म्हणून पुढे केले आहे. काँग्रेसची सूत्रे गौरव गोगोई यांच्या हाती एकवटली आहेत.

‘सीएए’वर काँग्रेसची मदार

‘सीएए’वरून आसामात निदर्शने केली जात आहेत. काँग्रेसने हाच धागा पकडून निवडणुकांना सामोरे जायचे ठरविले आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘सीएए’वर गरमागरम चर्चा सुरू आहे. मात्र, काँग्रेसने या विषयावर ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. भाजपने कोणत्याही स्थितीत हा मुद्दा धसास लावण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेजारच्या बांगला देशातून अनेक हिंदू कुटुंबे आसाममध्ये विस्थापित झाली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे तेथे या कुटुंबांवर कट्टरपंथीयांकडून झालेले अत्याचार. या कुटुंबांना भारतात अभय देण्यास आपण वचनबद्ध असल्याचे भाजपने म्हटले आहे. याच वातावरणाचा लाभ उठविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. याखेरीज राम मंदिर, जम्मू काश्मीरचे 370 कलम आणि तीन तलाक हे अन्य मुद्दे भाजपने हाती घेतले आहेत. तथापि, या प्रदेशाचा सर्वांगीण विकास हाच विषय भाजपने केंद्रस्थानी ठेवला आहे.

भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला आशा

राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला सर्मा यांनीही जोरकस उत्तर दिले होते. भारत जोडो यात्रेनंतर आसाममध्ये काँग्रेस पक्षात जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, केवळ त्यावरच काँग्रेसला अवलंबून राहता येणार नाही. जनभावनेचे रूपांतर मतपेटीत उमटविणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यावेळी जास्तीत जास्त जागा आसाममध्ये जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.

अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा या छोट्या राज्यांतही भाजपने यावेळी जोर लावला आहे. मात्र, मणिपूरमधील हिंसाचारामुळे तेथे भाजपला पीछेहाट सहन करावी लागण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवातच मणिपूरमधून केली होती. तेथील मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांच्या नेतृत्वावर वारंवार शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

भाजपला मोठ्या विजयाची अपेक्षा

मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा काही काळ बाजूला ठेवला तर ईशान्य भारताच्या चौफेर विकासासाठी ‘सेव्हन सिस्टर्स’द्वारे गेल्या दहा वर्षांत भाजपने जोरदार प्रयत्न केले, हे नाकारून चालणार नाही.

Back to top button