Lok Sabha Election 2024 : माढ्याची बंडाळी फडणवीसांच्या कोर्टात; अजितदादांचीही मध्यस्थी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : माढ्याची बंडाळी फडणवीसांच्या कोर्टात; अजितदादांचीही मध्यस्थी

फलटण; पुढारी वृृृत्तसेवा : माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माढा मतदार संघामध्ये माजलेली बंडाळी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात जाऊन पोहोचली. माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. अजित पवार यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, संजीवराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. बैठकीत आ. रामराजे ना. निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी केले. माढ्याचा तिढा पूर्ण सुटला नाहीच. रामराजेंनीही अफवांवर विश्वास ठेवू नका, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेऊ, असे जाहीर केल्याने सस्पेन्स वाढला आहे.

माढा लोकसभा मतदार संघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. महायुतीने या मतदार संघातून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पासूनच हा मतदार संघ चर्चेत राहिला आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळू देणार नाही. प्रसंगी संजीवराजेंना मैदानात उतरवू. खा. रणजितसिंह यांना दुसर्‍यांदा खासदार होऊ देणार नाहीच, अशा प्रकारची टोकाची भाषा आ. रामराजे यांनी जाहीरपणे केली होती. कार्यकर्त्यांनीही आम्ही घरी बसू, पण त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर आ. रामराजे यांनी माढा मतदार संघ राष्ट्रवादीकडे घ्या, तेथे वेगळा निर्णय घेतला, तर कार्यकर्त्यांना आवरणं मला कठीण जाईल, असा सूचक इशाराही दिला होता. दुसरीकडे भाजपचे मोहिते- पाटील यांनीही खा. रणजितसिंह यांच्या विषयी नाराजी व्यक्त करत खासदारकीचे तिकीट धैर्यशील मोहिते -पाटील यांना मिळावे यासाठी पक्षाकडे मागणी केली होती. मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी खा. रणजितसिंह यांना विरोध दर्शवला. गतवेळी मोहिते-पाटलांनी खा. रणजितसिंह यांना निवडून आणण्यात मोठी भूमिका बजावली होती. आता त्यांचा खासदारांना विरोध असताना तसेच महायुतीतील घटक पक्षाचे आमदार रामराजे गटाचाही विरोध असताना भाजपने खा. रणजितसिंहांनाच उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून माढा मतदारसंघात रोज हायहोल्टेज ड्रामे घडत आहेत.

आ. रामराजे यांनी दोन दिवसांपूर्वी फलटण, खटाव, माण, सांगोला तालुक्यांतील प्रमुख नेत्यांसमवेत अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते-पाटलांच्या घरी कमरा बंद चर्चा केली. यावेळी शेकापचे आ. जयंत पाटील हेही उपस्थित होते. तसेच माढा मतदारसंघातील सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जगताप यांच्यासह माढा मतदारसंघातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीचा सुगावा लागताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व भाजपचे संकटमोचक ना. गिरीश महाजन यांनी फडणवीस यांच्या सूचनेनुसार अकलूजच्या शिवरत्न बंगल्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी महाजन यांना घेराव घातला खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलेल्या उमेदवारीवरुन तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्यासमोरच प्रसंगी तुतारी हातात घ्या, अशा भावना व्यक्त झाल्या. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कसेबसे शांत केले. त्यानंतर मोहिते पाटील यांच्याशी सुमारे दीड तास कमरा बंद चर्चा झाली. ना. गिरीश महाजन बाहेर आले तर बाहेर अजूनही कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय होता. कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी ना. महाजन यांनी कार्यकर्त्यांना ‘तिकीट जाहीर झाले असले तरी उमेदवारी अर्ज भरायला वेळ आहे. राज्यात मोहिते पाटील यांची मोठी ताकद असून मोहिते पाटलांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही. मोहिते पाटलांची नाराजी जाणून घेण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी मला पाठवला आहे. इथला वृत्तांत मी देवेंद्र फडवणीस यांच्या कानी पोहोचवणार आहे’, असे सांगितले. त्यानंतर सोमवारी आ. संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर माढा मतदारसंघातील महायुतीच्या सहा आमदारांपैकी पाच आमदार व अन्य महत्वपूर्ण नेते एकत्र येऊन त्यांनीही बैठक घेवून खा. रणजितसिंहाच्या पाठीमागे महायुतीची वज्रमूठ असल्याचे जाहीर केले.

यानंतर मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रामराजे ना. निंबाळकर, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, संजीवराजे ना. निंबाळकर, अनिकेतराजे ना. निंबाळकर यांच्यासह बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं काम करण्याचे आवाहन आ. रामराजे यांना केले. महायुतीच्या उमेदवाराचे एकत्रितपणे काम करावे लागेल अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी रामराजे व जयकुमार गोरे यांनी आपापली मते मांडली. दोघांमध्ये बैठकीमध्ये मतभेदही झाले. फडणवीस व अजितदादा यांनी दोघांना एकत्र काम करण्याच्या सूचना केल्या. शेवटी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करतो, असे आ. रामराजे यांनी सांगितले. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटला अशी चर्चा सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र रामराजे कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेवू, असे जाहीर केल्याने आता रामराजेंच्या जाहीर मेळाव्याविषयी उत्सुकता आहे.

कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय; अफवांवर विश्वास नको : आ. रामराजे

या बैठकीनंतर सोशल मीडियावर आ. रामराजे खा. रणजितसिंहाचे काम करणार अशा पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामुळे राजे गटाचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले. उलट सुलट चर्चा होऊ लागल्याने बैठकीतून बाहेर आल्यानंतर आ. रामराजे यांनी व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस ठेवून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. आ. रामराजे यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे की, ‘अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतदार संघाबाबत बैठक झाली. यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा, अशी मला सूचना करण्यात आली. परंतु, मी स्थानिक कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदार संघातील समविचारी नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय देईल, असे सांगितले. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, संजीवराजे निंबाळकर, अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते. या बैठकीत अन्य कोणतीही चर्चा झालेली नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button