कोल्हापूर : अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराचा धुरळा; शाहू महाराज यांच्या गाठीभेटी, मेळावे सुरू | पुढारी

कोल्हापूर : अर्ज भरण्यापूर्वीच प्रचाराचा धुरळा; शाहू महाराज यांच्या गाठीभेटी, मेळावे सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरले नाहीत. शाहू महाराज यांनी आपली प्रचारमोहीम सुरू केली आहे. सध्या त्यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन त्यांना प्रचार मोहिमेत गुंतविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

शाहू महाराज यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी न्यू पॅलेस येथे प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आणि प्रचाराला गती देण्यात आली. संभाजीराजे आणि मालोजीराजे ही सारी मोहीम हाताळत आहेत. शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरून शरद पवार यांच्यावर टीका करत संजय मंडलिक यांनी मंडलिक गटाचा पवार विरोधाचा जुना राग आळवला आहे. शाहू महाराज यांना आपल्याविरोधात उभे करणे हे शरद पवार यांचेच षड्यंत्र असल्याचा आरोप संजय मंडलिक यांनी केला. शाहू महाराज यांनी कधीही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. मात्र शरद पवार हे त्यांना उभे करून मंडलिक घराण्यावरील जुना राग काढत असल्याचे सांगितले. दरम्यान शरद पवार गटाच्या वतीने मंडलिक यांचे विधान बालिश असल्याचे व त्यांना पराभव दिसत असल्याची टीका करण्यात आली.

शेट्टी भाजपला पाठिंबा देणार धैर्यशील मानेंचा गौप्यस्फोट

दरम्यान भाजपने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा निवडून आल्यावर मी तुमचाच असेन, असा शब्द राजू शेट्टी यांनी भाजपला दिल्याचा गौप्यस्फोट हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे. शेट्टी हे भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते असल्याचे सांगून माने म्हणाले, शेट्टी हे आपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. ते दरवेळी वेगळ्या भूमिकेत जातात. आताही ते महाविकास आघाडीत जाणार नाहीत म्हणत शिवसेना नेत्यांशी चर्चा करायला का जातात? दोन्ही दगडांवर हात ठेऊन ते आपली राजकीय पोळी भाजत असल्याचेही माने म्हणाले.

सात आणि साथ

कोल्हापूर, हातकणंगलेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी ‘सात तारखेला तुमची साथ कोणाला’, अशी पोस्टर्स संभाव्य उमेदवारांच्या छायाचित्रांसह झळकावली आहे. ‘मे सात, आम्हालाच साथ’, असे गार्‍हाणे पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना घातले आहे.

Back to top button