कोल्हापूर : पादचारी पुलाच्या कार्यक्रमास दांडी; पालकमंत्री मनपा प्रशासकावर नाराज | पुढारी

कोल्हापूर : पादचारी पुलाच्या कार्यक्रमास दांडी; पालकमंत्री मनपा प्रशासकावर नाराज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरिकांना सेवा देण्याच्या द़ृष्टीने रेल्वेफाटक पादचारी पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला महापालिकेच्या प्रशासन के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित राहणे गरजेचे असताना निडणूक प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांनी दांडी मारल्याने जाहीर कार्यक्रमातच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकार्‍यांना विकासकामाचे गांभीर्यच नसल्याचे यावरुन स्पष्ट होत असल्याचे मुश्रीफांनी सांगीतले.

एस.टी. स्टँड ते राजारामपुरी या दोन्हींमधून रेल्वेलाईन जाते. त्यामुळे पादचार्‍यांची गैरसोय होते. त्यांना बाबूभाई परिख पुलातून जाताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच जीव मुठीत धरूनच येथून प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा पादचारी पूल नागरिकांना सेवा देण्यासाठी महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमालाच प्रशासक नसल्याने त्यावरून मुश्रीफ संतप्त झाले. यापूर्वी नगरोत्थान योजनेतून मंजूर असलेल्या रस्ते कामाची वर्कऑर्डर देण्यावरून पालकमंत्री मुश्रीफ यांनी महापालिका प्रशासकांसह अधिकार्‍यांची कानउघडणी केली होती. त्यामुळे प्रशासन मुश्रीफ यांच्या कार्यक्रमास जाण्यास टाळतात.

शनिवारी रेल्वेफाटक येथे पादचारी पुलाचे भूमिपूजन होते. येथेही प्रशासक आल्या नाहीत. निवडणूक प्रशिक्षण असल्याचे सांगून त्यांनी या कार्यक्रमास येणे टाळले. तथापी, मुश्रीफ यांनी निवडणूक प्रशिक्षणाची माहिती घेतली. हे प्रशिक्षण सोमवारपासून (दि. 11) होते. दिल्लीला जाण्यासाठी विमाने भरपूर आहेत. त्यांना रविवारी किंवा कार्यक्रम संपल्यावर शनिवारी दुपारनंतरही जाता आले असते. परंतु त्यांनी कार्यक्रमाला येणे टाळल्याचे मुश्रीफांनी जाहीररित्या स्पष्ट केले.

Back to top button