रताळ्यांची 40 ते 70 रुपये किलोने विक्री; महाशिवरात्रीसाठी आवक वाढली | पुढारी

रताळ्यांची 40 ते 70 रुपये किलोने विक्री; महाशिवरात्रीसाठी आवक वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाशिवरात्रीनिमित्त तरकारी विभागात रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक आवक झाली आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळ्यांना किलोला दर्जानुसार 35 ते 38 रुपये तर करमाळा भागातून आलेल्या रताळ्यांना दर्जानुसार 14 ते 18 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 40 ते 70 रुपये किलोला भाव मिळत असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले. कराड, मलकापूर भागातून गावरान रताळ्यांची मागील वर्षी 1 हजार पोती आवक झाली होती. त्यामध्ये वाढ होऊन यंदा 2 ते 3 हजार पोती आवक झाली आहे. आवक वाढली असली तरीही गावरानला मागणी जास्त आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मागील वर्षापेक्षा भाव जास्त मिळाला आहे.

गावरानची आवक होतेय कमी

गावरान रताळी चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांंना जास्त मागणी असते. मात्र, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गावरान रताळ्यांची आवक वाढली आहे. तर मागील काही वर्षांचा विचार केल्यास दिवसेंदिवस गावरान रताळ्यांची आवक कमी होत चालली आहे. पूर्वी बीड जिल्ह्यातून आवक व्हायची. मात्र, येथील बाजारापेक्षा मुंबईला जास्त भाव मिळतो. त्यामुळे तेथून आणि कराड भागातून निर्यात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

मार्केट यार्डात मागील वर्षीच्या तुलनेत रताळ्यांची दुप्पट आवक झाली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने दर्जेदार मालाला भाव जास्त मिळाले आहेत.

– अमोल घुले, व्यापारी, मार्केट यार्ड

करमाळ्यात नवीन प्रजात विकसित

करमाळा भागातून येथील बाजारात मोठ्या प्रमाणात गावरान रताळ्यांची आवक व्हायची. मात्र, यंदा तेथे नवीन जात विकसित केली आहे. बेळगाव रताळ्यांच्या धर्तीवर ही जात विकसित केली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले आहे. बाजारात त्या भागातून तब्बल 4 ते 5 हजार पोती आवक झाली आहे. मात्र, त्याला गावरानसारखी चव नाही. ते रताळे रंगाने पांढरे असून, बारीक साल आहे. त्याला घाऊक बाजारात किलोस 14 ते 18 रुपये भाव मिळाला आहे. दरम्यान, यंदा कर्नाटक येथून रताळ्यांची आवक झालीच नाही. स्थानिक भागातच चांगला भाव मिळत असल्याने ही स्थिती आहे.

हेही वाचा

पेन्शनबाबत लक्षणीय विरोधाभास

भंडारा : चारा-पाण्याअभावी दगावली ३४ जनावरे

कस्तुरी क्लब विभागप्रमुखांच्या कलाविष्काराला मिळाली दाद

Back to top button