Rainbow Panipuri : आता आली रेनबो पाणीपुरी! | पुढारी

Rainbow Panipuri : आता आली रेनबो पाणीपुरी!

अहमदाबाद : पाणीपुरीसारखे चटपटीत पदार्थ खाणे कुणाला आवडत नाही? कुरकुरीत पुर्‍यांमध्ये गरमागरम रगडा, हिरवेगार मिरची-पुदिन्याचे पाणी, चिंचेची थोडी आंबट-गोड अशी चटणी घातलेली, भन्नाट चवीच्या पाणीपुरीची पहिली पुरी खाल्ली की मनाला जो आनंद होतो, तो सांगता येत नाही! मग त्यामध्ये काही ‘भैया और तिखा बनाओ’ म्हणत फक्त तिखट पाणीपुरी खातात, तर काहींना आंबट-गोड चवदेखील आवडते म्हणून ‘मीडियम’ पाणीपुरी खातात.

पण, सध्या सोशल मीडियावर ‘फ्यूजन फूड’चा ट्रेंड वाढत आहे. तसेच सर्व पदार्थांना पौष्टिक कसे बनवता येऊ शकते, याकडे अनेकजण लक्ष देतात. यातच सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील ‘रेनबो पाणीपुरी’ची जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही ‘सिक्स फ्लेव्हर पाणीपुरी’ याबद्दल ऐकले असेल आणि खाल्लीसुद्धा असेल. यामध्ये वेगवेगळ्या चवीच्या पाण्याचा, लसूण, पुदिना, जलजिरा इत्यादींचा वापर करण्यात येतो. मात्र, या रेनबो पाणीपुरीमध्ये पुरीपासून ते पाण्यापर्यंत सर्वांमध्ये भाज्यांचा रस आणि हळद यांचा वापर करण्यात आला आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहू. त्यानुसार पाणीपुरीच्या पुर्‍या या पिवळ्या, काळ्या आणि गुलाबी रंगाच्या असल्याचे आपल्याला दिसते. हे रंग येण्यासाठी गुलाबी रंगाच्या पुर्‍या बीटापासून, काळ्या रंगाच्या पुर्‍या जांभळापासून आणि पिवळ्या रंगाच्या पुर्‍या या हळदीचा वापर करून बनवल्या आहेत. तसेच हिरव्या पाण्यासाठी पालक आणि पुदिन्याचा वापर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसणारी महिला ‘या पुर्‍यांमध्ये, पाण्यामध्ये कोणत्याही खायच्या रंगाचा वापर केलेला नसून, केवळ भाज्यांचा रस करून आणि पुदिना आणि पालक वापरून तयार केले आहे’, अशी माहिती देते. तसेच व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननुसार या पाणीपुरीची किंमत ही 20 रुपये आहे, असे समजते. ‘खूप भन्नाट कल्पना आहे!’ असे एकाने लिहिले आहे. ‘पाणीपुरीबरोबर असे प्रयोग नका करू,’ असे दुसर्‍याने लिहिले आहे. तिसर्‍याने, ‘नको मी आपली नेहमीची पाणीपुरी खाईन’ असे म्हटले आहे.

Back to top button