लोकसभेच्या 23 जागांवर सेनेचा दावा : उदय सामंत यांची स्पष्टोक्ती | पुढारी

लोकसभेच्या 23 जागांवर सेनेचा दावा : उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा ; लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेने (शिंदे) आता मागील निवडणुकीत लढवलेल्या 23 जागांवर दावा सांगितला आहे. यापूर्वी लढलेल्या जागा शिवसेना लढणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

महायुतीत भाजप मोठा पक्ष असल्याने सर्वाधिक जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून शिवसेनेच्या (शिंदे) अनेक जागांवर दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समाजमाध्यमांवरून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचीच आहे,असा दावा केला आहे. मात्र सामंत यांचे बंधू किरण (भैय्या) सामंत येथे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीत धुसफूस वाढली आहे.

यासंदर्भात विधान भवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागा गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ही जागा लढण्याची आमचीही इच्छा आहे. इतकेच नव्हे, तर शिवसेनेने मागील लोकसभा निवडणुकीत 23 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीत त्याच जागा आम्ही लढणार आहोत. मात्र, मुख्यमंत्र्यांना जागावाटपाचा निर्णय घेण्याचे सर्वाधिक अधिकार दिले आहेत.

काही मैदानात उतरवण्याची तयारी

काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईतून उतरवण्याचा विचार शिंदे गटात होत असल्याचे कळते. देवरांच्या पक्षांतराने या मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. उद्योजक, बाजारपेठेचे समर्थन देवरा यांना असल्याने तेच ही जागा जिंकून देऊ शकतील, असे शिंदे गटाला वाटते.

Back to top button