विधिमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन | पुढारी

विधिमंडळाचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून प्रारंभ होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडल्याचा आरोप अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यामुळे या विषयांवरून सभागृहात रणकंदन माजू शकते. कायदा-सुव्यवस्था आणि शेतकर्‍यांचे प्रश्न यावरून विरोधी पक्ष राज्य सरकारला धारेवर धरू शकतात.

सोमवारी सकाळी 11 वाजता विधान परिषद, तर दुपारी 12 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल आणि फक्त पाच दिवस हे अधिवेशन चालेल. मंगळवारी 27 फेब्रुवारीस लेखानुदान सादर केला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकांमुळे लेखानुदान सादर होत असून पूर्ण अर्थसंकल्प जूनमध्ये मांडला जाणे अपेक्षित आहे.

राज्यात सध्या पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट आहे. दुष्काळ व अवकाळी पाऊस यांच्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले मात्र पंचनाम्याच्या खेळखंडोब्यात नुकसानभरपाई नाकारली जात असल्याचा आरोपही विरोधकांतर्फे केला जाणार आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटविल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिली. प्रत्यक्षात ही निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचे केंद्राने जाहीर केले. यावरून विरोधक विखे-पाटील यांना लक्ष्य करू शकतात. मनोज जरांगे यांच्यासाठी जारी केलेला कुणबी प्रमाणपत्रांचा सगेसोयरे अधिसूचनेचा मसुदाही या अधिवेशनात गोंधळ उडवू शकतो.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेला गोळीबार, शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या, कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या, सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला जात असल्याबद्दल विरोधक जाब विचारणार आहेत.

Back to top button