माणूस चालताना थांबते नदी, थांबला की वाहते? | पुढारी

माणूस चालताना थांबते नदी, थांबला की वाहते?

लंडन : हे जग म्हणजे एक माया किंवा भ्रम आहे असे आपल्याकडे म्हटले जाते. कधी कधी या भ्रामक जगातही अनेक भ्रम होत असतात. अशाच एका भ्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये दिसते की माणूस चालू लागला की नदीचा प्रवाह थबकतो आणि माणूस थांबला की नदी वाहू लागले! अर्थातच हा ‘ऑप्टिकल इल्युजन’चा एक प्रकार आहे!

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये एक नदी वाहताना दिसत आहे. एक महिला हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. ती कॅमेरा घेऊन चालायला लागली की, नदी वाहायची थांबते. जणू नदीत पाणी अचानक वाहायचं थांबल्यासारखं वाटतं; पण महिला थांबताच नदी पुन्हा वाहू लागते. ऑप्टिकल इल्युजनमुळे हे घडत आहे. याला ‘पॅरालॅक्स इफेक्ट’ म्हणतात. प्रत्यक्षात आपला मेंदू अग्रभागातील वस्तूंच्या सापेक्ष गतीचे मूल्यांकन करतो.

या व्हिडीओनुसार समजावून सांगायचं झालं तर, महिला कारमध्ये बसलेली दिसत आहे. गाडी धावू लागली की समोर दिसणारी बर्फाची चादर आणि लाकडी फांद्याही हालू लागल्याचे दिसू लागते. त्या तुलनेत नदी साचलेली दिसते; पण गाडी थांबली की समोरचा अग्रभाग थांबतो आणि नदी थांबल्यासारखी वाटते. हे सहसा सामान्यपणे नेहमीच दिसून येते, फक्त आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. अनेकांनी कमेंट करून आपला अभिप्राय दिला आहे. एकाने म्हटले, की त्या व्यक्तीने नदीला पॉज केले असेल! एकाने म्हटले, की हे ‘रिलेटिव्ह व्हेलॉसिटी’ मुळे होते. तिसर्‍याने म्हटले की तो पर्वत पाहात आहे, त्याला व्हिडीओमध्ये काय दाखवलं जात आहे हेच समजलं नाही! काही लोकांनी तर व्हिडीओलाच बनावट म्हटले!

Back to top button