कामे उरकण्याची नुसतीच घाई ; दर्जाचे काय ? | पुढारी

कामे उरकण्याची नुसतीच घाई ; दर्जाचे काय ?

कात्रज/कोंढवा : क्षेत्रीय कार्यालयस्तरावर नागरिकांच्या सहभागातून होणारी विकासकामे, क्षेत्रीय कार्यालय निधी व देखभाल दुरुस्ती, अशी कामे केली जातात. मात्र, वाढत्या समस्या आणि देखभाल, दुरुस्तीसाठी अपुर्‍या असलेल्या निधीमुळे कोंढवा-
येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयास तारेवरची कसरत करावी लागत असून, विकासकामांसाठी निधीची तरतूद कमी पडत आहे.
या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 38, 41 व 43 अंतर्गत उंड्री, तसेच नव्याने समाविष्ट पिसोळी, वडाचीवाडी व गुजर निंबाळकरवाडी या भागाचाही समावेश होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा भाग मोठा असल्याने प्रशासनाला विकासकामे करताना

अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नागरिकांच्या सहभाग निधीतून 2 कोटी 71 लाख रुपयांतून 65 कामे सुरू असून 50 कामे पूर्ण झाली असून उर्वरित पंधरा कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे बजेटमधून 65 कामे सुरू असून 5 कोटी 85 लाख निधीतून केली जात आहेत. यापैकी 30 कामे पूर्ण तर 35 कामे प्रगतीपथावर आहेत. देखभाल, दुरुस्तीची एकूण 46 कामे असून 30 कामे पूर्ण झाली आहेत. क्षेत्रीय कार्यालयास देखभाल, दुरुस्तीच्या कामांसाठी 10 कोटींची तरतूद मिळते. त्यापैकी आरोग्य विभाग व झाडकामासाठी आठ कोटी तरतूद लागते. त्यामुळे उर्वरित दोन कोटी देखभाल, दुरुस्तीसाठी शिल्लक राहत आहेत. कोंढवा, उंड्री परिसरातील ‘मार्च एंडिंग’ जसे जवळ येत आहे, तसे विविध विकासकामे घाईने उरकण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विकासकामे 65 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून,
ती मार्चअखेरपर्यंत
पूर्ण करण्यात येणार आहेत.

– डॉ. ज्योती धोत्रे, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

‘प्रशासकराज’वर नाराजी

मुंढवा –  वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभागामध्ये मार्चअखेरच्या विकासकामांची लगबग सुरू आहे. पथ, ड्रेनेज, आरोग्य, तसेच विद्युत विभागामार्फत काही कामे सुरू आहेत. मात्र, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक काम फक्त दहा लाख इतक्या खर्चाचे असल्याने अपेक्षित कामे पूर्ण होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मागील दोन वर्षांपासून महापालिकेमध्ये प्रशासक असल्याने अनेक कामे मार्गी लागत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यातच पुरेसा निधी मिळत नसल्याने आम्हाला विकासकामे मार्गी लावता येत नाहीत, असे वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

प्रभाग 25 मध्ये पथ विभागाला 2023-24 साठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यामध्ये अंतर्गत रस्त्याचे सिमेंट व डांबरीकरणाची फक्त वीस कामे (पॅचेसची) झाली आहेत. यामध्ये आझादनगर, मानेनगर, जांभूळकरमळा, एस. व्ही. नगर, जगतापनगर आदी भागांमध्ये ही कामे झाली आहेत. प्रभाग 27 मध्ये नवाजीश पार्क, मुठानगर, साईबाबानगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाची 20 लाख रुपयांची कामे सुरू आहेत. प्रभाग 24 मधील रामटेकडी परिसरामध्ये मुख्य रस्त्याच्या बाजूचे पदपथ नादुरुस्त आहेत. तसेच रामटेकडी औद्योगिक वसाहतीमध्ये टँकर पॉइंटच्या शेजारी असलेला रस्ता नादुरुस्त आहे. येथील हिल साईट सोसायटीच्या समोरील मुख्य रस्त्यावर मागील चार महिन्यांपूर्वी रस्ता खोदून ठेवला होता. मात्र, अजूनही तो नादुरुस्त असल्याने याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मार्चअखेरच्या विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याप्रमाणे जी कामे मंजूर झाली आहेत, त्यांचे काम सुरू आहे.
काही कामे पूर्णही झाली आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथील कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहोत.

– बाळासाहेब ढवळे पाटील, सहायक आयुक्त, वानवडी क्षेत्रीय कार्यालय.

हेही वाचा

Back to top button