IT vs Congress : आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती का गोठवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण | पुढारी

IT vs Congress : आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती का गोठवली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Income Tax Department vs Congress : प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि संलग्न संघटना युवक काँग्रेसची बँक खाती आयकर विभागाने गोठविल्याच्या घटनेचे काँग्रेसमधून शुक्रवारी संतप्त पडसाद उमटले. आयकर विभागाच्या अपिलिय लवादाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसला अंतरिम दिलासा देताना बँक खाते वापरण्यास मुभा दिली आहे.

काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी शुक्रवारी सकाळी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन बँक खाते गोठविल्याबद्दल केंद्र सरकारला लक्ष्य केले. होता. काँग्रेसने जारी केलेले धनादेश वटण्यात अडथळे येत असून बँकेकडून पैसे थांबविण्यात आले आहेत. २०१८-१९ च्या आयकर विवरणपत्राच्या मुद्द्यावरून आयकर खात्याने काँग्रेसचे बँक खाते गोठविले असून २१० कोटी रुपयांची वसुली पक्षाकडे काढली आहे असे अजय माकन यांचे म्हणणे होते. हा प्रकार केवळ खाते गोठविण्याचा नसून भारतीय लोकशाही गोठविण्यात आल्याचा आरोप माकन यांनी केला.

पाठोपाठ राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संतप्त होऊन यावर खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधींनी, हुकूमशाहीसमोर काँग्रेसपक्ष कधीही झुकणार नाही असा इशारा दिला. काँग्रेस हे नाव धनशक्तीचे नव्हे तर जनशक्तीचे आहे. आम्ही हुकूमशाहीसमोर कधीही झुकलो नव्हतो आणि झुकणारही नाही. भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता प्राणपणाने लढेल, असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले. तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, काँग्रेसचे खाते गोठविणारे मोदी सरकार सत्तेच्या नशेमध्ये धुंद झाल्याचा आरोप केला. खर्गे यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये म्हटले, की सत्तेच्या नशेत बेधुंद झालेल्या मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसची बँक खाती गोठविली आहेत. हा लोकशाहीवर आघात आहे. भाजपने घटनाबाह्य पद्धतीने जमा केलेला पैसा निवडणुकांमध्ये खर्च होईल आणि काँग्रेसने लोकवर्गणीतून जमा केलेले पैसे सील केले जातील. म्हणूनच आमचे म्हणणे आहे, की भविष्यात निवडणुका होणारच नाहीत. न्यायपालिकेने यात हस्तक्षेप करावा आणि देशात बहुपक्षीय व्यवस्था वाचवावी, असेही खर्गे यांनी म्हटले. यानंतर, भारतीय युवक काँग्रेसतर्फे निदर्शनेही करण्यात आली होती.

दरम्यान, या घटनाक्रमानंतर प्राप्तिकर खात्याच्या अपिलिय लवादाना कॉंग्रेसची बँक खाती पुन्हा सुरू केल्याची माहिती पक्षाचे नेते व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ विवेक तनखा यांनी सोशल मिडियावरून दिली. लवादाच्या पुढील सुनावणीपर्यंत काँग्रेसशी संबंधित बँक खात्यांवरील बंदी हटविण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, काँग्रेस खजिनदार अजय माकन यांनीही सोशल मिडियावरील पोस्टद्वारे याला दुजोरा देताना हा पक्षासाठी दिलासा नसल्याचे स्पष्ट केले. माकन यांनी म्हटले, की प्राप्तिकर विभाग आणि अपिलिय लवादाने दिलेल्या आदेशानुसार कॉंग्रेसच्या बँक खात्यामध्ये ११५ कोटी रुपये बॅंक खात्यात ठेवावे लागणार आहेत. त्यापेक्षा अधिक असलेली रक्कम खर्च करण्याची मुभा आहे. याचा अर्थ खाती गोठवली गेली आहेत. ती सुरू ठेवण्यासाठी २१० कोटी रुपयांचा दंड भरण्याची मागणी झाली असल्याकडेही अजय माकन यांनी लक्ष वेधले.

Back to top button