गद्दारांनी शिर्डीतून उमेदवारी करून दाखवावीच : उद्धव ठाकरे | पुढारी

गद्दारांनी शिर्डीतून उमेदवारी करून दाखवावीच : उद्धव ठाकरे

सोनई : पुढारी वृत्तसेवा : एक खासदार तिकडे पाणी भरायला गेलेच आहेत. त्यांनी पुन्हा उभे राहूनच दाखवावे. निष्ठावंत त्यांना पराभवाचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना आव्हान दिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. खा. लोखंडे यांची गद्दारी ठाकरे यांच्या जिव्हारी लागली असून येथील ‘संवाद मेळाव्यात’ त्यांनी त्यावर भाष्य केले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री आ. शंकरराव गडाख, जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सुनील गडाख, उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांच्यासह सेनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, शिर्डीत आपल्या उमेदवारासमोर भाजप व भ्रष्ट साथीदारांनी उमेदवार उभा करूनच दाखवावा. मग कळेल निष्ठावंत कसा पाणी पाजतो ते. उगाच निळवंडे धरणाचे श्रेय घेत आहेत. मेहनत आपली आहे, त्याचे पाणी नाही पाजायचे, पराभवाचे पाणी पाजयाचे, असा घणाघात करतानाच ठाकरे यांनी मतदारांनाही साद घातली. पंतप्रधान येतील, मेरे भाईयो बहनो, प्यारे देशवासीयो, सबका साथ, असे म्हणतील. मात्र निवडून आल्यावर मित्राचा विकास. त्या वेळी त्यांना शेतकरी दिसत नाही. सुटाबुटातले मित्र पाहिजे. फक्त निवडून देण्यापुरता शेतकरी हवा, शेतकर्‍यांमुळे मोदी दिल्लीत पोहचले, पण शेतकर्‍यांना वेशीवर अडवलं, अशी लोकशाही, पंतप्रधान पुन्हा पाहिजे का?, असा सवाल करत त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला जातो. त्यांच्या डोळ्यात आधीच अश्रू आहेत. ते हमीभाव मागत आहेत, भीक नाही. यांना मात्र मित्राची तुमडी भरायची, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

शिर्डीत सरकारमान्य गुंडागर्दी

येथील संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नामोल्लेख न करता टीकेचे बाण सोडले. ठाकरे म्हणाले, शिर्डीत किती जबरदस्ती, गुंडशाही वाढली. ही सरकारमान्य गुंडागर्दी रोखणार कोण? हे घराणं दहा घरे फिरले. आपल्याकडेही आले होते. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना यांना, त्यांच्या वडिलांना मंत्री केले, तेही ते विसरले. जिकडे सत्ता तिकडे आम्ही. आता कुठे जाणार? भाजप आायुष्यातील राजकारणाचे शेवटचे ठिकाण आहे. कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार. सरकार आल्यावर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी लावणार आहे. आज जी काही लूटमार करताहेत करू द्या. आज तुमचे दिवस, उद्याचा दिवस आमचा असेल. विजयाची सभा शिर्डीत घेईन, भूलथापांना बळी पडू नका, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. पीएम कितीही येऊ दे, थापा मारू देत, 400 पार म्हणा, पण राज्यात चारदेखील येणार नाही. जागे राहा, जीवन असहाय करणार्‍यांना कायमचे झोपवा, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.

आमदार गडाख यांच्या निष्ठेचे कौतुक

‘काय तुमचं वर्णन करू? सोनईतील सोन्यासारख्या मर्द मावळ्यांनो,’ असे संबोधत, ‘तुमच्या प्रेमाने मी भारावलो,’ असे भावोद्गार काढत उद्धव ठाकरे यांनी संवाद मेळाव्याच्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, की माझ्याकडे देण्यास काही नाही, तरीही इतके प्रेम पाहून मी नतमस्तक आहे. आमदार शंकरराव गडाखांचे जाहीर कौतुक करताना ठाकरे म्हणाले, की राजकाकारणात इकडून तिकडे जातात. गडाखांची शिवसेनेशी जवळीक नव्हती, तरीही ते सोबत आले. मीही विश्वास टाकून त्यांना मंत्रिपद दिले. गद्दारांनी सरकार पाडले नसते तर शंकरराव आजही मंत्री असते. राज्यातील सत्तांतराचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, की शंकरराव आज तिकडे गेले असते तरी त्यांना मंत्रिपद मिळाले असते; पण शब्द दिला की मागे हटणार नाही, ही भूमिका घेत गडाख यांनी जे धाडस दाखविलं, त्यालाच निष्ठा म्हणतात. मला काही मिळो अथवा न मिळो; पण ज्यांनी निवडून दिले त्यांना दगा देणार नाही, या भूमिकेमुळेच आ. गडाखांवर जनता प्रेम करते, असे कौतुक ठाकरे यांनी केले. खा. संजय राऊत यांनीही ‘ठाकरे-गडाख’ जोडी म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचे सांगत गडाखांची निष्ठा, साथ कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत आ. गडाखांबद्दल गौरवोद्गार काढले.

Back to top button