Bhandara Accident : मुलांना पाणी पाजताना कारची धडक; पत्नी ठार, पतीसह मुले जखमी | पुढारी

Bhandara Accident : मुलांना पाणी पाजताना कारची धडक; पत्नी ठार, पतीसह मुले जखमी

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर दुचाकी उभी करुन मुलांना पाणी पाजत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पत्नीचा मृत्यू तर पतीसह दोन्ही मुले जखमी झाली आहेत. अपघातानंतर जमावाने कारला पेटवून दिल्याची घटना भंडारा तालुक्यातील शहापूर ते मोहदुरा मार्गावर रविवारी (दि. ११ ) रोजी दुपारच्या सुमारास घडली. कल्पना अमित हाडगे ( वय २८) असे मृत महिलेचे नाव असून अमित लिलाधर हाडगे व त्यांच्या दोन मुलांचा जखमींमध्ये समावेश आहे. (  Bhandara Accident )

संबंधित बातम्या 

मुळचे बालाघाट जिल्ह्यातील वाराशिवनी येथील अमित हाडगे हे सध्या एमआयडीसी हिंगणा येथे राहतात. रविवारी (दि. ११ फेब्रुवारी ) रोजी अमित, त्यांची पत्नी कल्पना आणि त्यांची दोन्ही मुले नागपूरवरुन बालाघाटकडे दुचाकी ( क्र. एमएच ३१ एफटी २७६६) ने निघाले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास शहापूर ते मोहदुरा रस्त्याच्या कडेला त्यांनी दुचाकी थांबविली. त्यांची पत्नी कल्पना ही मुलांना पाणी पाजत असताना शहापूरकडून सातोनाकडे भरधाव जाणाऱ्या कारने ( क्र. एमएच ३६ एच ४८२८) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कल्पना हाडगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमितसह त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत.

दरम्यान या अपघातानंतर जमाव गोळा झाला आणि त्यातील काहींनी कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कारला पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कारचालक गौरीशंकर रामकृष्ण कुंभलकर ( वय ३८, रा. खोकरला, भंडारा ) याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. तसेच कार जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नितनवरे करीत आहेत. (  Bhandara Accident )

Back to top button