सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमचा खून | पुढारी

सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदमचा खून

कुरूंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरूंदवाड-नांदणी रस्त्यावरील एका शेतालगत सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम (वय 36, रा. गावभाग सांगली) याचा धारदार चाकूने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मोटारीत आढळून आला.

गुरुवारी रस्त्यावरून जाणार्‍या शेतकर्‍यांच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृतदेहा- जवळून दोन धारदार चाकू, स्पोर्ट शूज व एक फुटलेला मोबाईल जप्त केला. फिर्याद प्रफुल्ल प्रकाश कदम (रा. सांगली) याने कुरूंदवाड पोलिसांत दिली असून, गुन्हा सांगली शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, माहिती अधिकाराच्या माध्यमातून कदम याचे अनेक विरोधक तयार झाले होते. काहीजणांनी यापूर्वी कदम याला मारहाणही केली होती. त्याद़ृष्टीने पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे. सांगली येथील दोन माजी नगरसेवकांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुरुंदवाड-नांदणी रस्त्यावर गट क्रमांक 1012/1 यांच्या शेतलगत अनोळखी मारुती स्विफ्ट (एमएच 09 बीबी 806) उभी असलेली काही शेतकर्‍यांना दिसली. एका शेतकर्‍याने वाहनात डोकावून पाहिले असता गाडीत ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्या शेतकर्‍याने तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सदरची माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस पोलिस फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, सांगली शहरचे पोलिस निरीक्षक विजय मोरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे रवींद्र कळमकर, फॉरेन्सिक तपासणी केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

संतोष कदम हा बुधवारी दुपारी पत्नीला आपण तीन-चार मित्रांसोबत कुरुंदवाडला जात आहे, असे सांगून गेला होता, रात्री उशिरा तो घरी न आल्याने गुरुवारी सकाळी त्याचा पुतण्या प्रफुल्ल कदम आणि पत्नीने सांगली शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची वर्दी दिली होती. पुतण्या प्रफुल्लहा त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेत घटनास्थळी आला. हे वाहन माझ्या काकाचे असल्याचे त्याने सांगत वाहनातील मृतदेह संतोष कदमचा असल्याचे निष्पन्न झाले. पुतण्या कदम याच्या फिर्यादीवरून तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी गाडीतून दोन धारदार चाकू जप्त केले. शिवाय मृत संतोष याचा मोबाईल फुटक्या अवस्थेत सापडला. झटापटीत मोबाईल फुटला असण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाहनाची दरवाजे खुली करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दतवाड ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदन करण्यात आले आहे. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Back to top button