पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या नावे बनावट सिम कार्ड | पुढारी

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीच्या नावे बनावट सिम कार्ड

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : प्रसिध्द उद्योगपती व माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश रसिकलाल धारीवाल यांच्या नावाने बनावट सिम कार्ड घेऊन त्या नंबरवरून लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या नंबरचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी, असे पत्र पुणे पोलिस आयुक्त (ठाणे अंमलदार, सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर) यांना प्रकाश धारीवाल यांनी दिले. या पत्रात धारीवाल यांनी म्हटले आहे की, त्यांच्या नावाने (बनावट) सिम कार्ड घेऊन लोकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. धारीवाल यांच्या नावाने मोबाईल क्रमांक 9913215976 या क्रमांकावरून फेक प्रोफाईल बनवून काही लोकांना फोन करून पैसे मागितल्याचे धारीवाल यांना तक्रार आली होती.

धारीवाल यांचे व्यावसायिक, समाजात भारतभर संबंध गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. या संबंधांचा कोणी दुरुपयोग करून लोकांची फसवणूक करण्याचा दाट संशय आहे. तो नंबर कोणाच्या नावे आहे? तो नंबर कोणी आणि कुठे रजिस्टर केला? त्या व्यक्तीने माझ्या नावाने काही ई-मेल अकाउंट व सोशल मीडियाचे अकाउंट उघडले तर नाही ना, याची खातरजमा करावी. संबंधित व्यक्तीला कायद्यानुसार कडक शासन करावे तसेच हा नंबर आमच्या परिवाराशी संबंधित नसून कुणीही या फेक प्रोफाईलला प्रतिसाद देऊ नये, अशी मागणी करीत योग्य ती कारवाई करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

Back to top button