महामहिम राजा चार्ल्स तृतीय लवकर बरे व्हावेत; पंतप्रधान मोदींची प्रार्थना | पुढारी

महामहिम राजा चार्ल्स तृतीय लवकर बरे व्हावेत; पंतप्रधान मोदींची प्रार्थना

पुढारी ऑनलाईन डेस्क : किंग चार्ल्स यांना कर्करोगाची लागण झाली असल्याची माहिती बकिंगहम पॅलेसने सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या एका पत्रकातून दिली. किंग चार्ल्स यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली आहे.

प्रधानमंत्री मोदी यांनी ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “मी भारतातील लोकांसह महामहिम राजा चार्ल्स तृतीय लवकर बरे व्हावेत आणि त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करतो.”

दरम्यान, हा कर्करोग नेमका कोणता आहे व कोणत्या टप्प्यात आहे, याचा मात्र बकिंगहम पॅलेसने खुलासा केलेला नाही. तूर्तास, किंग चार्ल्स यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, इतकेच यात नमूद आहे. प्रतिकूल परिस्थिती असली तरी किंग चार्ल्स उपचाराबाबत अतिशय सकारात्मक आहेत आणि शक्य तितक्या लवकर सेवेत रुजू होण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, असे बकिंगहम पॅलेसने प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. किंग चार्ल्स यांनी सर्व सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रमातून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे. ७५ वर्षीय किंग यापूर्वी रविवारीच चर्च सर्व्हिससाठी सार्वजनिक ठिकाणी आले, त्यावेळी त्यांनी उपस्थितांना हातवारे करून अभिवादन केले. लंडनमधील एका खासगी इस्पितळात आठवड्यापूर्वी त्यांच्यावर प्रोस्टेट प्रोसिजर करण्यात आली होती.

Back to top button