सातारा आरटीओत ‘स्मार्ट’ घोटाळा | पुढारी

सातारा आरटीओत ‘स्मार्ट’ घोटाळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मूळ वाहनांचे जमा असलेले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी स्मार्ट कार्ड) सातारा आरटीओ कार्यालयातून अनधिकृतपणे घेऊन त्याद्वारे बोगस कार्ड बनवून फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एजंटांसह 19 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एजंट राहुल गुजर, सतीश देशमुख, रमजान मुजावर, शीतल भागवत, किरण जाधव, रामकृष्ण वाळेकर, ओंकार पवार, दिनेश जाधव, अमृता राजपुरे, सागर गायकवाड, वैष्णवी जाधव, विजय काजळे, ओंकार जाधव, प्रवीण सोनमले, गंगाराम शेडगे, साहिल पिसाळ, हरुण सय्यद, संपत ठोंबरे, वाजीवअली शिकलगार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संदीप म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 19 संशयितांनी संगनमत करून मूळ वाहनांचे जमा असलेले नोंदणी प्रमाणपत्र (आरसी स्मार्ट कार्ड) सातारा आरटीओ कार्यालयातून अनधिकृतपणे मिळवले. त्यानंतर त्या स्मार्ट कार्डवरील मूळ असलेला सर्व तपशील नाहीसा करून आवश्यक असणार्‍या वाहनांचा तपशील छापून त्याद्वारे ते स्मार्ट कार्ड बोगस बनवले.

बनावट तयार केलेेल्या स्मार्ट कार्डचा वापर वाहनांवरील कर्जाचा बोजा कमी करणे, पत्ते बदलणे तसेच वाहन हस्तांतरण करण्यासाठी केला. तसेच आरटीओ कार्यालयातील 29.30 व 35 हे नमुने फॉर्म भरून कार्यालयाची फसवणूक केली. दरम्यान, आरटीओ कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर सर्व चौकशी करण्यात आली. चौकशीअंती गंभीर गुन्हा घडल्याने सातारा शहर पोलिस ठाण्यात आरटीओच्या वतीने तक्रार देण्यात आली.

Back to top button