पद कमावले आहे, कुटुंबाची सेवा करुन मिळवले नाही : जयशंकर यांचे काँग्रेसला प्रत्‍युत्तर | पुढारी

पद कमावले आहे, कुटुंबाची सेवा करुन मिळवले नाही : जयशंकर यांचे काँग्रेसला प्रत्‍युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्‍ही सरकारसाठी काम करतो. एका कुटुंबासाठी काम करत नाही, पद कमावले आहे. कुटुंबाची सेवा करुन मिळवले नाही, अशा शब्‍दांमध्‍ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केलेल्‍या बोचर्‍या टीकेला प्रत्‍युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश काय म्‍हणाले होते?

जयराम रमेश यांनी ४ जानेवारी रोजी आपल्‍या X वरील पोस्टमध्ये जयशंकर यांच्‍यावर बोचरी टीका केली होती. त्‍यांनी म्‍हटलं होतं की, “पंतप्रधानांसोबत स्वतःचे संबंध आणखी सुधारावेत म्‍हणून परराष्‍ट्र मंत्री नेहरुंवर टीका करतात. प्रत्येकवेळी मी नेहरूंबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची विधाने वाचतो, तेव्हा मी समजू शकतो की, विधान करणारा एक नव-धर्मांतरित आहे. ज्याला स्वतःला पंतप्रधानांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्‍यासाठी नेहरुंवर टीका करावी लागते; पण असे करताना त्यांनी सर्व बौद्धिक प्रामाणिकपणा आणि वस्तुनिष्ठता गमावली आहे.”
त्‍यांना वाटते प्रत्येकजण कुटुंबासाठी काम करतो : जयशंकर 

‘व्हाय भारत मॅटर्स’ या आपल्‍या नवीन पुस्तकाविषयी ‘इंडिया टुडे’शी बोलत असताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “आम्ही भारत सरकारसाठी काम करतो. एका कुटुंबासाठी नाही. मला वाटते की सरकारसाठी काम केलेले बहुतेक लोक त्यांनी त्यांची पदे मिळवणे पसंत करतील; परंतु जे कुटुंबासाठी काम करतात त्यांना अजूनही असे वाटते की इतर प्रत्येकजण कुटुंबासाठी काम करतो. मी पद कमावले आहे, कुटुंबाची सेवा करुन मिळवले नाही, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

 

Back to top button