आईच्या फितुरीनंतरही अत्याचार्‍याला सक्तमजुरी | पुढारी

आईच्या फितुरीनंतरही अत्याचार्‍याला सक्तमजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आठ वर्षीय पीडितेची आई फितूर झाली असतानाही चिमुकलीचा लैंगिक छळ करणार्‍या नात्यातील 24 वर्षीय तरुणाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. दंड न भरल्यास त्याला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद केले आहे. ही घटना 18 जुलै 2021 रोजी चतृ:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे पीडितेच्या आईनेच याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी किराणा दुकान चालविते. घटनेच्या दिवशी तिला भावजयने फोन करून दुकानातून घरी बोलावून घेतले. आरोपीने घरात बोलावून 8 वर्षीय मुलीशी लैंगिक छळ केल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली होती. नंतर तीच फितूर झाली. त्यानंतर पीडितेची साक्ष महत्त्वाची मानत न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभुते आणि शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत आणि संतोष कोळी यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालय कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक रेणुसे, हवालदार तुपसुंदर आणि शिपाई पुकाळे यांनी मदत केली.

Back to top button