ICC ODI Team : आयसीसीचा सर्वोत्कृष्ट वनडे संघ जाहीर! रोहित शर्मा कर्णधार | पुढारी

ICC ODI Team : आयसीसीचा सर्वोत्कृष्ट वनडे संघ जाहीर! रोहित शर्मा कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 सालचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या दोन-दोन तर न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

रोहित-शुभमन गिल सलामी जोडी (ICC ODI Team)

आयसीसीने रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना सलामी जोडी म्हणून निवडले आहे. गिलने 2023 मध्ये 50 षटकांचा फॉरमॅट चांगलाच गाजवला. त्याने 29 सामन्यांमध्ये 63.36 च्या उत्कृष्ट सरासरीने 1584 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच शतके आणि नऊ अर्धशतके फटकावली. तर रोहितने गेल्या वर्षी खेळलेल्या वनडे सामन्यांत 52 च्या सरासरीने 12.55 धावा केल्या, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.

ट्रॅव्हिस हेडला तिस-या क्रमांकावर पसंती

तिस-या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला पसंती मिळाली आहे. त्याने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जेतेपदाच्या सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावून हेडने इतिहास रचला होता.

विराट चौथा फलंदाज (ICC ODI Team)

टीम इंडियाचा चेस मास्टर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. त्याने गेल्या वर्षी 27 सामन्यात 72.47 च्या सरासरीने 1,377 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 शतके झळकावली. 2023 च्या विश्वचषकात विराटने विक्रमी 765 धावा तडकावल्या. तो ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरला होता. न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेल याला पाचव्या स्थानी फलंदाजीसाठी निवडले आहे. त्याने गेल्या वर्षी 1,204 धावा केल्या होत्या. गेल्या वनडे वर्ल्ड कपमध्येही त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत 69.00 च्या सरासरीने 552 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 46.35 च्या सरासरीने 927 धावा केल्या. यात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

तीन भारतीय गोलंदाजांना स्थान

आयसीसीने आपल्या संघात तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश केला आहे. संघाच्या वेगवान गोलंदाजीची कमान मोहम्मद शमीकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजलाही संघात स्थान मिळाले आहे. कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. कुलदीप हा गेल्या वर्षी सर्वाधिक एकदिवसीय विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20.48 च्या सरासरीने 49 बळी घेतले. सिराजने 2023 मध्ये 25 एकदिवसीय सामने खेळले, ज्यात त्याने 20.68 च्या सरासरीने 44 विकेट घेतल्या. शमीने 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16.46 च्या सरासरीने 43 बळी घेतले. वर्ल्डकप 2023 मध्ये त्याने फक्त 7 सामन्यात 10.70 च्या सरासरीने सर्वाधिक 24 बळी घेतले. (ICC ODI Team)

यानसेन अष्टपैलू खेळाडू

द. आफ्रिकेच्या मार्को जॅनसेनला अष्टपैलू म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून जॅनसनने 2023 मध्ये 20 एकदिवसीय सामने खेळले आणि 29.96 च्या सरासरीने 33 बळी मिळवले. वर्ल्डकप 2023 मध्ये त्याने 9 सामन्यात 17 विकेट घेतल्या आणि फलंदाजीत 157 धावा केल्या.

झाम्पा दुसरा फिरकीपटू

आयसीसीच्या संघात ऑस्ट्रेलियाच्या झाम्पाकडे फिरकीची जबाबदारी आहे. त्याने गेल्या वर्षी 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 26.3 च्या सरासरीने 38 विकेट घेतल्या आहेत. त्याने वर्षभरात एकूण पाच वेळा चार विकेट घेण्याची किमया केली. विश्वचषक स्पर्धेतही त्याने 22.39 च्या सरासरीने 23 बळी घेतले आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आयसीसीचा पुरुष वनडे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रॅव्हिस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, अॅडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

महिलांच्या संघात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व

आयसीसीने महिलांच्या निवडलेल्या वनडे संघात ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 5 खेळाडूंची निवड झाली आहे. या संघात एकाही भारतीय महिला खेळाडूला संधी मिळालेली नाही. श्रीलंकेच्या चमारी अटापटूला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

आयसीसी महिला वनडे संघ

फोबी लिचफिल्ड, चमारी अटापटू (कर्णधार), अ‍ॅलिस पेरी, अमेलिया केर, बेथ मुनी, नॅट सायव्हर ब्रंट, अॅश्ले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, नादिन डी क्लार्क, ली ताहुहू, नाहिदा अख्तर.

Back to top button