Mumbai | ३ कर्मचाऱ्यांना लोकलने उडवले, वसई रोड- नायगाव रेल्वे स्टेशनदरम्यान दुर्घटना | पुढारी

Mumbai | ३ कर्मचाऱ्यांना लोकलने उडवले, वसई रोड- नायगाव रेल्वे स्टेशनदरम्यान दुर्घटना

पुढारी ऑनलाईन : उपनगरीय मार्गावरील वसई रोड आणि नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान सिग्नल पॉईंट बिघाड दुरुस्ती करत असताना लोकलच्या धडकेने पश्चिम रेल्वेच्या (डब्ल्यूआर) तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सोमवारी ही दुर्घटना घडली. वरिष्ठ विभाग अभियंता (सिग्नल) वासू मित्रा, सहाय्यक (सिग्नल आणि दूरसंचार) सचिन वानखेडे आणि सिग्नल मेंटेनर सोमनाथ उत्तम लांबतुरे अशी मृतांची नावे आहेत.

पश्चिम रेल्वेच्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७.३२ वाजण्याच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकांदरम्यान पॉइंट बिघाडाची दुरुस्ती करण्यासाठी पाच कर्मचारी तेथे गेले होते. त्यापैकी तिघा कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने उडवले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिकारी अपघातानंतर घटनास्थळी दाखल झाले.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, तिघांच्या कुटुंबातील वारसांना तातडीने मदत म्हणून ५५ हजार रुपये देण्यात आले आहेत. “यापुढे १५ दिवसांच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सानुग्रह अनुदान आणि इतर रक्कम वितरीत केली जातील. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला अंदाजे ४० लाख तर वासू मित्रा याच्या कुटुंबाला १.२४ कोटी रुपये देण्यात आले आहेत,” असे ठाकूर यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

“या रकमेव्यतिरिक्त मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना सेटलमेंट देय (DCRG, GIS, leave encashment) दिले जातील. पश्चिम रेल्वेनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

मित्रा यांच्या पश्चात त्यांचा १७ वर्षांचा मुलगा आणि पत्नी आहे. तर लांबतुरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी आहे आणि वानखेडे यांच्या पश्चात त्यांची आई आहे.

 हे ही वाचा :

 

Back to top button